कुकडीचे आवर्तन लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 01:27 PM2019-03-03T13:27:24+5:302019-03-03T13:27:58+5:30
कुकडी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काल बैठक झाली. कुकडी क्षेत्रातील येडगाव धरणामधून १० ते १५ एप्रिल दरम्यान आणि पिंपळगाव जोगे धरणातून दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काल बैठक झाली. कुकडी क्षेत्रातील येडगाव धरणामधून १० ते १५ एप्रिल दरम्यान आणि पिंपळगाव जोगे धरणातून दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतक-यांना तब्बल दीड महिन्यानंतर पाणी मिळणार आहे.
कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी धरणातील पाणीसाठा शिल्लक ची माहिती दिली. पिण्याचे पाणी व फळबागांना एक आवर्तन देऊ शकतो. येडगाव धरणातून पाणी सोडण्याजोगी परिस्थिती नाही. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणाले, पिंपळगाव जोगे धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यातून कालव्यात पाणी सोडावे. हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर येडगाव धरणात पाणी सोडावे. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, २०१२ मध्ये यापेक्षा कठीण परिस्थिती असताना कुकडीतून फळबागा व पिण्यासाठी पाणी सोडले होते. पिंपळगाव जोगे धरणातून पाणी देता येऊ शकते. शेतकरी जगवायचा असेल एकच पाणी द्या. पण फळबागांना द्या. दरवेळेस आम्ही आरोपी आहेत असे समजता. आम्हाला हक्काचे पाणी द्यायचे नसेल तर बैठकीला बोलविता कशासाठी असा संतप्त सवालही पाचपुते यांनी केला. पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. सध्या साडेसात टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जून अखेर पिण्याचे पाण्याचा विचार करून १० एप्रिलपासून येडगाव धरणातून पाणी सोडण्यात येईल. यावेळी विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आमदार दिलीप वळसे, आमदार राहुल जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार शरद सोनवणे, राजेंद्र नागवडे उपस्थित होते.