अहमदनगरच्या मातीतील प्रज्ञावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:54 PM2019-08-18T13:54:48+5:302019-08-18T13:55:15+5:30

देशभक्त रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन यांची नव्या पिढीला फारशी ओळख नाही. अहमदनगरची जुनी पिढी मात्र पुरती जाणून आहे. पत्रमहर्षी अण्णा आपटे यांनी मला तहहयात सभासद करून रावसाहेब आणि अच्युतराव यांच्या नावाशी ओळख करून दिली. पुढे काही काळ देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीचा मी सेक्रेटरी म्हणूनही काम केले. त्यामुळे रावसाहेब आणि अच्युतराव यांची संपूर्ण हयात वाचता आली. परिचय करून घेता आला.

Prominent in the soil of Ahmednagar | अहमदनगरच्या मातीतील प्रज्ञावंत

अहमदनगरच्या मातीतील प्रज्ञावंत

अहमदनगर : रावसाहेब पटवर्धन यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. नगरमध्येच ते वाढले, शिकले आणि पुढे बनारस विश्वविद्यालयात उच्च शिक्षण मिळविले. १९२२ साली महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात त्यांनी उडी घेतली. १९३०, १९३२, १९३९ आणि १९४२ च्या आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला. अच्युतराव पटवर्धन हे रावसाहेबांचे बंधू. स्वातंत्र्य चळवळीत रावसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले. प्रदिर्घ काळ भूमिगत राहून स्वातंत्र्य आंदोलनाला बळ दिले. मात्र, स्वातंत्र्यानंतर सत्तेच्या राजकारणापासून दोघेही पटवर्धन बंधू दूर गेले. सत्तेच्या पटावर कायम टिकून राहण्यासाठी जिवाचा आकांत करणारे पाहिल्यावर पटवर्धन बंधू नेमके सत्तेपासून दूर का गेले, हा प्रश्न आजही अनेकांना पडलेला आहे.
या प्रश्नाचे उत्तर त्यांच्यावर बालपणी झालेल्या संस्कारात आणि मिळवलेल्या ज्ञानात दडलेले आहे़ अर्थात रावसाहेब आणि अच्युतराव ज्यांना पूर्ण माहीत आहेत त्यांचा हा प्रश्न मुळात नाहीच तर ज्यांना ते उमगलेच नाहीत त्यांचेसाठी हा प्रश्न आजही शिल्लक आहे. जसा अहमदनगर शहरात पटवर्धन वाडा शिल्लक आहे अगदी तसाच.
१५ जुलै १९०३ रोजी हरिभाऊ पटवर्धनांच्या सधन, सुसंस्कृत कुटुंबात रावसाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरी केशव पटवर्धन हे अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील होते. हरिभाऊ व सेनापती बापट हे सहाध्यायी होते. रावसाहेबांचे नाव पुरुषोत्तम असे ठेवण्यात आले होते. त्यांना सर्व राऊ असे म्हणत असत. रावसाहेब नावाप्रमाणेच रूपवान आणि बुद्धिवान होते. रावसाहेबांचे पाठोपाठ अच्युतराव, जनार्दनपंत, बाळासाहेब, पद्माकर, मधुकर आणि विजयाताई ही भावंडे जन्माला आली.
रावसाहेबांचे व अच्युतरावाचे शिक्षण नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. त्याकाळी रावसाहेबांचे वडील हे लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या होमरुल लीगचे काम करीत असत. ते विचाराने थियॉसॉफिस्ट होते. डॉ़ अ‍ॅनी बेझंट नगरला आल्यावर त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असावयाचा. हरिभाऊंनी त्यांच्या मुलांवर आणि परिसरातील मुलांवर देशभक्तीचे संस्कार केले. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयांचा  अभ्यास व पाठांतर करण्याची सवय प्रथमपासूनच लावल्यामुळे त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळविली होती. आॅल इंडिया ओरिटरी स्पर्धेत सुवर्णपदक आणि लक्ष्मीची चांदीची मूर्ती त्यांना मिळाली होती.
अगदी तरुण वयात बनारस येथील विश्वविद्यालयीन शिक्षणाबरोबरच अंबिकाश्रमातील संस्कारामुळे रावसाहेबांचे व्यक्तिमत्त्व संपन्न बनले. त्याचबरोबर वागण्याबोलण्यातही बनारसी छाप दिसू लागली. त्यांनी तत्त्वज्ञान विषयात पदवी मिळवली. त्याचबरोबर इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र या विषयाचाही खूप अभ्यास केला.
१९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. या वर्षाचे अखेरीस नागपूरला जे काँग्रेसचे अधिवेशन झाले, त्यामध्ये असहकारितेची कल्पना विविध कार्यक्रमाद्वारे स्पष्ट करण्यात आली. या निश्चित कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य आंदोलनाची कल्पना सर्वसामान्यांपर्यंत नेता आली. सर्व तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला. देशासाठी प्रत्येकजण स्वार्थ त्याग करू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नाने स्वातंत्र्य अधिक जवळ येईल, असा विश्वास निर्माण झाला. स्वातंत्र्य मिळवणे हे जीवनाचे एकमेव ध्येय ठरवून त्यासाठी सर्व वेळ समर्पण भावनेने काम करणाºया निष्ठावान, हुशार आणि कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांचे गट देशाच्या सर्व भागात कार्य करू लागले. स्वातंत्र्य लढ्यात नवे चैतन्य, नवे सामर्थ्य निर्माण झाले.
सर्वत्र सत्याग्रहाचे वारे वाहू लागले, या प्रवाहापासून रावसाहेब आणि त्यांचे बंधू अच्युतराव अलिप्त राहिले नाही. देशभक्तीचे संस्कार बालपणापासूनच झालेल्या रावसाहेबांवर विद्यार्थी दशेत ऐन तरुण वयात असतानाच गांधीवादाचा संस्कार झाला. त्यांच्या कर्तृत्वाची सुरुवातच गांधीयुगात झाली. १९३०, १९३२, १९३९ व १९४२ अशा चारही लढ्यात त्यांनी दीर्घ मुदतीचा कारावास भोगला. रावसाहेब एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. 

बनारस येथे उच्च शिक्षण घेतलेल्या रावसाहेबांना प्राध्यापक, संशोधक, वकील म्हणून लौकिक मिळवता आला असता. पण देशातील अस्थिर परिस्थितीने त्यांना अंतर्मुख केले व आपले सारे जीवन त्यांनी देशसेवेसाठी वेचायचा निर्धार केला. त्यांनी गांधीजींच्या संघर्षात्मक व विधायक अशा दोन्ही कार्यात सक्रिय सहभाग घेतला. खादी व ग्रामोद्योग, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू-मुस्लिम ऐक्य व दारूबंदी ही गांधीजींची चतु:सूत्री त्यांना पूर्णत: मान्य होती. या विचारांना त्यांनी आपल्या लेखणीने आणि वाणीने प्रकट केले. गांधी- नेहरू हे त्यांचे आदर्श होते. रावसाहेबांनी नगरमध्ये संघशक्ती हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाद्वारे त्यांनी महात्माजींचा संदेश खेडोपाड्यापर्यंत पोहचवला. स्वदेशीची चळवळ त्यांनी झोपडीपर्यंत नेली. त्यांनी स्थापन केलेल्या साखर कामगार युनियनमार्फत १०० चरखे फिरू लागले.
१९३८ साली रावसाहेबांचा माणिकताई गोळे यांच्याशी विवाह झाला. माणिकताई आणि रावसाहेब हे आते-मामे भावंडे होते. त्यामुळेच हा विवाह नोंदणी पद्धतीने झाला.
अच्युतराव हे रावसाहेबांपेक्षा दोन वर्षांनी लहान होते. त्यांचेही शिक्षण बनारस येथेच झाले. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर त्यांनी नोकरी सोडून स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. १९४२ च्या आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी कार्य केले. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून देणाºयास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. काँग्रेसच्या कार्यकारिणीतही त्यांनी काम केले. काँग्रेसमधून समाजवादी पक्ष बाहेर पडला. समाजवादी पक्षाच्या स्थापनेत अच्युतरावांचा फार मोठा वाटा होता. ते रावसाहेबांपेक्षा अधिक जहाल विचारांचे होते. रावसाहेबांनी केंद्रीय काँग्रेस कार्यकारिणीतून बाहेर पडल्यावर स्थानिक पातळीवर म्हणजे नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्याला वाहून घेतले. काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने केले. समाजवादी पक्षाचे ते रुढार्थाने सभासद नव्हते. पण समाजवादाची दिशा त्यांनी सोडली नाही.
म्हणजे रावसाहेब हे मूळ काँग्रेसमध्ये तर अच्युतराव हे मूळ काँग्रेस सोडून समाजवादी काँग्रेसमध्ये होते. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. रावसाहेब हे नेहरूंच्या तर अच्युतराव जयप्रकाशांच्याजवळ होते.
१९४५ साली रावसाहेबांची तुरुंगातून सुटका झाली. नगर जिल्ह्यातील जनतेने रावसाहेबांचा सत्कार करत त्यांना १० हजार रुपयांची थैली अर्पण केली. त्या थैलीचा उपयोग त्यांनी कामगार हितासाठी केला.
१९४६ साली कोपरगावच्या शंकरबागेत रावसाहेबांनी एक हजार तरुणांचे एक मोठे शिबिर घेतले. १९४८ पर्यंत निरनिराळी एकूण सहा मोठी शिबिरे घेतली. साखर कामगारांच्या संघटना स्थापून त्यांना हक्कांची जाणीव करून दिली. कामगारांना पगारी रजा, बोनस, ग्रॅच्युईटी, प्रॉव्हीडंट फंड, पगारवाढ, राहण्यास घरे या मागण्या मिळवत असताना मुलांच्या शिक्षणाची सोय केली. १९५८ साली रावसाहेबांच्या 
प्रयत्नामुळे ६० हजार रुपये खर्चून हरेगावला ११ खोल्यांची इमारत बांधली व तिचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
१९४६ साली बेळगावच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘संयुक्त महाराष्टÑ’ या मराठी भाषिक प्रांताची मागणी करण्यात आली. परंतु मराठी साहित्य संमेलन किंवा मराठी साहित्य परिषदही राजकीय समस्या सोडविण्याचे व्यासपीठ नव्हे, म्हणून २८ जुलै १९४६ ला शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली ‘संयुक्त महाराष्टÑ परिषद’ ही सर्वपक्षीय आणि अपक्षीय संघटना स्थापन झाली. शेवटी १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्टÑाचे स्वप्न साकार झाले.


नेहरूंची मैत्री
गांधींनंतर नेहरू पर्व सुरू झाले. नेहरूंचा रावसाहेबांवर विशेष प्रभाव होता. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू हे भारतीय समाजापुढे आदर्श नेते होते. पण रावसाहेबांचे जवळचे मित्र होते. दोघेही स्वातंत्र्यपूर्व काळातील ध्येयवादी तरुण होते. रावसाहेबांनी काँग्रेस संघटनेचे कार्य निष्ठेने केले. नगर जिल्हा काँग्रेस समितीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाचे ते सभासद होते. याच काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य रावसाहेबांनंतर माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात नुकतेच झाले आहेत. खरेतर रावसाहेबांनंतर नगर जिल्ह्याला ही संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. नेहरूंनी स्वातंत्र्योत्तर काळात काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी आपले वैयक्तिक दूत म्हणून रावसाहेबांना पाठविले होते. रावसाहेब दिल्लीला गेल्यावर पंडितजींकडे त्यांचे वास्तव्य असे़ तासन्तास ते विविध विषयांवर चर्चा करीत असत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रावसाहेबांनी देशाचे उपराष्टÑपतीपद स्वीकारावे किंवा निदान ब्रिटनमधील हायकमिशनरपद  तरी स्विकारावे अशी गळ नेहरूंनी घातली. पण  रावसाहेबांनी सत्तेच्या जागा घेण्याचे नाकारले. एकदा पंडित नेहरू रावसाहेबांना म्हणाले, ‘राऊ मी तुझ्यासाठी काय करावे म्हणजे तुझे समाधान होईल.’ रावसाहेब पंडितजींना म्हणाले, ‘मला तुमचा असा एकुलता एक मित्र समजा की, त्याने तुमच्याजवळ काही मागितले नाही व ज्याच्यासाठी तुम्ही काही केले नाही़’ यातून त्यांची विशुद्ध मैत्री आणि निरपेक्ष प्रेम दिसून येते. रावसाहेब १९५० ते १९५६ दरम्यान साधना साप्ताहिकाचे संपादक होते. मृत्युसमयी साने गुरुजींनी तशी इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण करण्यासाठी रावसाहेब संपादक राहिले. २८ आॅगस्ट १९६९ रोजी रावसाहेबांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला तर अच्युतरावांनी ५ आॅगस्ट १९९२ रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अच्युतराव हे अखेरच्या कालखंडात मद्रासला राहत होते. तेथील थिआॅसॉफिकल सोसायटीच्या (ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज यांच्या विचाराला छेद देऊन पुढे आलेला पंथ) कार्यालयात ते रहायचे. जे. कृष्णमूर्तीनंतर या कार्याची सर्व धुरा ते सांभाळत होते.देशाला हे दोन्ही बंधू विचारांचा निरपेक्ष वारसा देऊन गेले. अहमदनगरच्या मातीचा हा गुण देशभर आजही दरवळतो आहे. दिवसेंदिवस त्या विचारांची आणि कर्तृत्वाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. लवकरच महात्माजींच्या १५० व्या जयंतीचे पर्व सुरू होत आहे आणि त्यामध्ये अशा कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्यांची आठवण येणे सहज शक्य आहे.


लेखक- प्रा. दशरथ खोसे (निवृत्त ग्रंथपाल, अहमदनगर)

Web Title: Prominent in the soil of Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.