संपदा खटला : सुनावणीला गैरहजर राहणा-या तपासी अधिका-यांना न्यायालयाकडून वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 07:35 PM2018-01-24T19:35:37+5:302018-01-24T19:36:16+5:30
सुनावणीसाठी नियमित हजर न राहिल्याने जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्था अपहार खटल्यातील तत्कालीन तपासी अधिका-याला वॉरंट काढले
अहमदनगर : सुनावणीसाठी नियमित हजर न राहिल्याने जिल्हा न्यायालयाने संपदा नागरी सहकारी पतसंस्था अपहार खटल्यातील तत्कालीन तपासी अधिका-याला वॉरंट काढले असून, हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संपदा पतसंस्था अपहार प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात न्यायधीश रवींद्र पांडे यांच्यासमोर खटला सुरू आहे. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. ढगे हे या खटल्यात कामकाज पाहत आहेत. पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक व्ही. एम. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात आतापर्यंत १९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या खटल्यात तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तपासी अधिकारी असलेले पवार यांची नियुक्ती सध्या ठाणे येथे आहे. सूचना देऊनही ते खटल्याच्या सुनावणीला हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यावर वॉरंट काढून सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संपदा पतसंस्थेत झालेल्या अपहारात अनेक ठेवीदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. त्यामुळे या खटल्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.