महापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:14+5:302021-05-27T04:23:14+5:30
अहमदनगर : आगामी महापौर निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेकडून नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त निवडणुकीबाबत काय ...
अहमदनगर : आगामी महापौर निवडणुकीचा प्रस्ताव महापालिकेकडून नाशिक येथील विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त निवडणुकीबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.
महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ येत्या ३० जून राेजी संपुष्टात येत आहे. विद्यमान महापौरांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच निवडणूक घेऊन नवीन महापौरांची निवड केली जाते. नगरसचिव विभागाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची वेळ व तारीख जाहीर होईल. साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आगामी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. पुढील पंधरा दिवसांत महापौरपदासाठी निवडणूक होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. आगामी महापौरपद अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी राखीव झाले आहे. भाजप वगळता सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडे महापौरपदासाठी महिला उमेदवार आहेत. राज्यात हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून महापौर पदावर दावा केला जात आहे. महापौर पदासाठी सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. स्थानिक पातळीवर सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे महापौर पदाचा निर्णय वरिष्ठांवरच अवलंबून आहे. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ काय निर्णय घेतात, यावरच पुढचा महापौर कुणाचा हे ठरणार आहे.
....
राजकीय घडामोडींना वेग
महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या बैठका सुरू आहेत. संख्याबळ कमी असले तरी या तिन्ही पक्षांच्या वादात महापालिकेत भाजपला महत्त्व प्राप्त होणार आहे; परंतु वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यास इतर पक्षांचे महत्त्व कमी होईल. मात्र, स्थानिक पातळीवर हे तिन्ही पक्ष एकत्र येतील का, याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.