मराठा आरक्षणासाठी दहा दिवसांपासून पाथर्डीत ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 03:54 PM2018-08-06T15:54:29+5:302018-08-06T15:54:49+5:30
गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला.
पाथर्डी : गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला. २७ जुलै रोजी पाथर्डी शहरात मराठा क्रांती मोर्चातर्फे भव्य मोर्चा काढला. मोर्चानंतर आंदोलकांनी नाईक पुतळयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात दररोज विविध गावांचे हजारो युवक सहभागी होत आहेत. दिवसभर ठिय्या व रात्री विविध कार्यक्रम असा नित्यक्रम गेल्या दहा दिवसांपासून चालू आहे. रविवारी सकाळी ढाकणे यांनी भेट दिली. सरकारच्या चुकीच्या घोरणांमुळे आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून तामिळनाडू राज्यात ७० टक्के आरक्षण मिळते तर महाराष्ट्रात का मिळत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हे फसवणीस आहेत. या प्रश्नावर आता सर्व वारक-यांनी एकत्र येवून आंदोलन उभे करावे, असे ते म्हणाले.
आ. राजळे म्हणाल्या की, मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, येत्या ९ आॅगस्ट रोजी होणा-या आंदोलनात आम्ही सहभागू राहू. शासनाने होस्टेलच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या होत्या त्याला विलंब झालेला आहे परंतु हे प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. तसेच मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीत सर्वांनी मते मांडली आहेत. मराठा बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे.