शाळेसाठी चिमुकल्यांचे आंदोलन, लेखी आश्वासनानंतर पाचेगाव येथील विद्यार्थ्यांचे उपोषण सुटले
By साहेबराव नरसाळे | Published: October 5, 2023 08:21 PM2023-10-05T20:21:46+5:302023-10-05T20:22:29+5:30
विनाअडथळा शाळा खोल्यांचे काम करण्याचे लेखी आश्वासन
साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: एकीकडे राज्य शासनाकडून मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा केली जाते. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कुचंबणा कशी सुरु आहे, याचे बोलके चित्र नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मराठी शाळेच्या मंजूर असलेल्या तीन नवीन खोल्यांच्या बांधकामातून दिसून येत आहे. या शाळा खोल्यांचे काम व्हावे, यासाठी चक्क शाळेतील चिमुकल्या मुलांनाच उपोषणाला बसण्याची दुर्दैवी वेळ आली. दुपारी तालुका प्रशासनाला जाग आली अन् त्यांनी विनाअडथळा शाळा खोल्यांचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चिमुकल्यांनी उपोषण मागे घेतले.
अधिकाऱ्यांनी अधोरेखित केलेल्या मोकळ्या जागेवरच शाळा खोल्यांचे बांधकाम विना अडथळा सुरू करावे. तसेच बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, लेखी निवेदनाशिवाय काम बंद करू नये आदी. मागणीचे शालेय व्यवस्थापन समितीने गत आठवड्यात तहसीलदार,पंचायत समिती विभाग, पोलिस स्टेशन यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
पाचेगाव जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मंजूर असलेल्या तीन शाळा खोल्यांचे बांधकाम थांबविण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्याने विद्यार्थ्यांच्या बैठकीचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे निवेदन देऊनही बांधकाम सुरू न झाल्याने अखेर विद्यार्थी, पालक आणि शालेय व्यवस्थापनाचे सदस्य यांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
दुपारी १ वाजता नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, बांधकाम अभियंता राजेंद्र नागपुरे, उपअभियंता दत्तात्रय कर्डिले, पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, गटशिक्षण अधिकारी शिवाजीराव कऱ्हाड यांनी उपोषणकर्त्याशी संवाद साधत बांधकाम विना अडथळा सुरू राहील, अशा आशयाचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर दुपारी दीड वाजता उपोषण मागे घेण्यात आले.