सिद्धटेकमध्ये ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:44+5:302021-05-13T04:21:44+5:30
कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायतीमधील सतत गैरहजर असणारे ग्रामसेवक अमोल बरबडे आठ दिवसांपासून गावात फिरकले नाहीत. कोरोना काळात ...
कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक ग्रामपंचायतीमधील सतत गैरहजर असणारे ग्रामसेवक अमोल बरबडे आठ दिवसांपासून गावात फिरकले नाहीत. कोरोना काळात त्यांचे गावाकडे दुर्लक्ष झाले, असा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या खुर्चीला बुधवारी हाल घालून निषेध नोंदविला.
येथे अमोल बरबडे हे ग्रामसेवक आहेत. ते तीन महिन्यापासून सतत गैरहजर आहेत. त्यामुळे सरपंच पल्लवी सुजित गायकवाड यांनी त्यांना २६ फेब्रुवारीला मुख्यालयी राहण्याबाबत पत्र काढून सूचना केल्या होत्या. परंतु, त्यावरही बरबडे मुख्यालयी न राहता कर्जत येथे राहत असून ग्रामपंचायत कार्यालयात कायम गैरहजर राहत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या सिद्धटेकमध्ये कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. गावातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरपंच पल्लवी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ग्राम समितीची स्थापना करण्यात आली. यात सरपंच अध्यक्ष तर ग्रामसेवक व पोलीस पाटील सचिव आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी यांचा या समितीत सहभाग आहे. मात्र या समितीमधील पोलीस पाटील कोरोना बाधित असल्याने ते पंधरा दिवसांपासून हजर नाहीत, तर ग्रामसेवक सतत गैरहजर असतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या रिकाम्या खुर्चीला ग्रामस्थांनी हार घालून निषेध नाेंदविला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट मोरे, गणेश भोसले, सखाराम तांदळे, सुजित गायकवाड, किशोर सांगळे व दत्ता सांगळे आदी उपस्थित होते.
---
१२ सिद्धटेक
सिद्धटेक येथे ग्रामसेवकाच्या खुर्चीला हार घालून ग्रामस्थांनी निषेध नोंदविला.