आंदोलनकर्ते झोपले आयुक्तांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 01:49 PM2021-03-17T13:49:54+5:302021-03-17T13:50:15+5:30
अहमदनगर : मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र ...
अहमदनगर : मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले. प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन करण्यात आले.
मुकुंदनगरमधील प्रभाग ३ मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या भागातील प्रामुख्याने नशेमन कॉलनी, इशरद पार्क, छोटी मरियम मस्जिद, जीशान कॉलनी, एन.एम. गार्डन परिसर, सी.आय.व्ही. सोसायटी, नम्रता कॉलनी, सहारा सिटी, मेहराज मस्जिद परिसर, दर्गा दायरा, शहाशरीफ पार्क, संजोगनगर, दगडी चाल, अमर कॉम्प्लेक्स, अमन कॉलनी, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, हुसेनी कॉलनी, सहाजी पार्क, बिहारी चाल, कौसर बाग, दरबार कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, अलमास पार्क, बजाज कॉलनी, इक्रा स्कूल परिसर व बरेच ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.
फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे. पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे व प्रभागांमधील वॉल मॅनचा वेळ वाया जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाकडून भुयारी गटार योजना मंजूर असून, ती त्वरीत कार्यान्वीत करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. मुकुंद नगर मधील नागरी समस्या न सुटल्यास बजेट ची सर्वसाधारण ची सभा होणार आहे. त्यामध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.