इंधन दरवाढीविरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:11+5:302021-02-23T04:32:11+5:30
अहमदनगर : घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...
अहमदनगर : घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेलवरील सर्व कर माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हाध्यक्ष अमोल भंडारे, युवक अध्यक्ष शहेबाज शेख, भिंगार शहराध्यक्ष अजय सोलंकी, प्रमोद ठाकूर, संतोष उदमले, मीजान कुरेशी, श्रीपाद वाघमारे, संतोष त्रिंबके, लक्ष्मण साळे, बाबासाहेब त्रिंबके, वसीम शेख, गणेश निमसे आदी सहभागी झाले होते.
देशात पेट्रोल महागाईचे शतक पूर्ण करीत आहे. दिवसेंदिवस डिझेल व घरगुती गॅसचे दर वाढत आहेत. अनेक सर्वसामान्य नागरिकांचा कोरोनामुळे रोजगार हिरावला गेला आहे. तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असताना सर्वसामान्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. मागील काळात क्रूड ऑइलचा भाव ११० ते १२५ प्रतिडॉलर असतानादेखील पेट्रोल ८० आणि डिझेल ७० रुपये प्रतिलिटर होते. जागतिक क्रूड ऑइलचा दर हा ६० ते ७० रुपये प्रतिडॉलर असतानाही केंद्र शासनाने लावलेल्या जास्तीत जास्त करांमुळे सर्वच पेट्रोलियम पदार्थ महाग झाले आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. दरवाढ आटोक्यात न आल्यास आठ दिवसांनी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
-----------
फोटो- साजीद
घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.