मुलगा जिल्ह्यातच मोठा साहेब झाल्याचा अभिमान; माता-पित्यांनी कार्यालयात येऊन दिले आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:30 PM2020-10-24T14:30:39+5:302020-10-24T14:31:39+5:30
कष्ट घेत मुलाला शिकविले, मुलानेही आमच्या कष्टाचं सोनं केलं. आता साहेब झालेला आमचा मुलगा जिल्ह्यातच रुजू झालायं याचा मोठा अभिमान आहे़, अशी भावना अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे माता-पिता उद्धवराव व जमुनाबाई यांनी व्यक्त केली.
अहमदनगर : कष्ट घेत मुलाला शिकविले, मुलानेही आमच्या कष्टाचं सोनं केलं. आता साहेब झालेला आमचा मुलगा जिल्ह्यातच रुजू झालायं याचा मोठा अभिमान आहे़, अशी भावना अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचे माता-पिता उद्धवराव व जमुनाबाई यांनी व्यक्त केली.
डॉ. राठोड यांनी नुकताच नगरचा पदभार स्वीकारला आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील शिरापूर आहे. सोमवारी डॉ़. राठोड यांचे वडील उद्धवराव व आई जमुनाबाई यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन डॉ. राठोड यांना आशीर्वाद देत त्यांचे कार्यालय डोळे भरून पाहिले़.
यावेळी डॉ. राठोड यांनी माता-पित्यांचे दर्शन घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, आई निरक्षर तर वडील हे पहिली शिकलेले आहेत. आयुष्यभर त्यांनी ऊसतोडणी मजुरीसह अनेक कष्टांची कामे केली. मात्र मुलांनी शिकून मोठं व्हाव़, असे त्यांचे स्वप्न होते. माता-पित्यांचे खडतर परिश्रम मी आयुष्यात कधीच विसरलो नाही.
गोरगरिबांची सेवा करण्यासाठी ते मला प्रेरणा व ताकद देतात असे ते म्हणाले.