जिल्ह्याला पुरेशी लस उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:56+5:302021-05-30T04:18:56+5:30
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण ...
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे महाभयंकर संकट आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. यासाठी नगर जिल्ह्याला लवकरात-लवकर लसीकरणाचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.
मंत्री टोपे हे मुबंईहून औरंगाबादकडे जात असताना शनिवारी दुपारी काहीवेळ शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी आमदार जगताप यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक गणेश भोसले, विनित पाऊलबुधे, मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा आदी उपस्थित होते. जगताप यांनी नगर शहरात कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच लहान मुलांसाठी धोक्याची असलेल्या तिसऱ्या लाटेसाठी नगर शहरातील बालरोग समितीच्या माध्यमातून करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी मंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोनाचे संकट सर्वांच्या सहकार्यातून हद्दपार करायचे आहे. यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सरकारच्या वतीने सर्व आरोग्य सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली.
--
फोटो- २९ संग्राम जगताप
नगर येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी दुुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करताना आमदार संग्राम जगताप, सभापती अविनाश घुले, गणेश भोसले, महापालिका आयुक्त शंकर गोरे, विनित पाऊलबुद्धे आदी.