"नागरी सेवा-सुविधा पुरवठा करा, अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करा"
By रोहित टेके | Published: March 27, 2023 06:19 PM2023-03-27T18:19:02+5:302023-03-27T18:19:46+5:30
आरपीआयची मागणी : मुख्याधिकारी गोसावी यांना निवेदन
कोपरगाव (जि. अहमदनगर ): शहरात नगरपरिषदेकडून सध्या पाणीपट्टी, घरपट्टीची अन्यायकारक वसुली होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे दुरुस्तीचे अर्धवट कामासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन बसवलेल्या पूर्णकृती पुतळ्यास तडा गेलेला असून त्यांची दुरुस्ती करून त्याचा अनावरण सोहळा करण्याबरोबरच विविध मागण्याचे आरपीआयच्या वतीने सोमवारी (दि.२७) कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले, कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात गोरगरीब व सर्वसामान्य लोक राहतात. अशुद्ध व दुर्गंध युक्त पाणी पुरवठा केला जात आहे. वर्षातून केवळ ५० दिवसच पाणी ते मिळत आहे. स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सुविधा, रोगराई आजार वाढू नये म्हणून औषध फवारणी, चांगली रस्ते, धुळ रहित गाव अशा अनेक सुविधा अजूनही देऊ शकलेलं नाही आणि दुसरीकडे बळजबरीने घरपट्टी पाणीपट्टी वसूल करत आहे ही अन्यायकारक वागणूक नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित नाही. नगरपालिकेने चांगले कामे करावी, हातावरचे गोरगरीब नागरिक सुद्धा स्वतःहून सर्व पट्टी भरेल. याचा नगरपालिकेने गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात नागरिकांना घेऊन महिला भगिनींना घेऊन नगरपालिकेत आम्ही ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे. यावेळी आरपीआयचे प्रदेश राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सचिव दीपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हा सचिव मनोज काळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, तालुका उपाध्यक्ष फकीरा चंदनशिव, शहर प्रमुख रामदास कोपरे, अनिस शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.