शेवगावातील श्रीराम ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याचे प्रांताधिका-यांचे आदेश; ‘लोकमत’ने वृत्तमालिकेतून वेधले होते लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:29 PM2020-03-06T13:29:26+5:302020-03-06T13:30:41+5:30
शेवगाव शहरातील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. संबंधित जागेच्या भाडेपट्टा फेरफार, इतर हक्कात घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. दोन वर्षापासून ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधले होते.
शेवगाव : शहरातील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिले आहेत. संबंधित जागेच्या भाडेपट्टा फेरफार, इतर हक्कात घेण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. दोन वर्षापासून ‘लोकमत’ ने वृत्त मालिकेच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधले होते.
शेवगाव शहरातील नेवासा रस्त्यावरील श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या जागेवर बेकायदा हॉटेल, शोरूम, दुकाने, इमारती उभारण्यात आल्या होत्या. बेकायदा हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या नोंदींबाबतचे हे प्रकरण ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे उजेडात आणले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रांताधिका-यांसमोर सुरू होती.
याबाबत दिलेल्या आदेशात प्रातांधिकाºयांनी म्हटले आहे की, महसूल व वन विभाग यांच्या परिपत्रकान्वये देवस्थान जमिनीची तपासणी करून बेकायदा हस्तांतरित झालेल्या जमिनीच्या नोंदीचे पुनर्रिक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार श्रीराम देवस्थान ट्रस्ट इनाम वर्ग तीनमधील जमिनीचा बेकायदा भाडेपट्टा करार रद्द करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांनी दिला होता. याबाबतच्या नोंदी पुनर्रिक्षण करण्यासाठी संबंधीतांना लेखी व तोंडी म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा निकाल पारित करण्यात आला. भाडेपट्टा फेरफार व इतर हक्कात घेतलेल्या सर्व नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या गट नं. १३१३, १३१४ व १३१५ वरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी संयुक्त मोहीम हाती घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर लड्डा धर्मशाळा जागेवरील अनाधिकृत बांधकामाचा विषयही चर्चेत आला आहे. त्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अतिक्रमणाबाबत सोमवारी बैठक..
तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी यांची सोमवारी (दि.९) दुपारी दोन वाजता येथील अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात शेवगाव येथे बैठक होणार आहे.