सुरक्षारक्षकांच्या पगारापोटी ६६ लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:47+5:302021-04-04T04:20:47+5:30
जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत व लाल टाकी येथील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने यासाठी माजी सैनिक महामंडळाच्या वतीने १५ सुरक्षारक्षक ...
जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत व लाल टाकी येथील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने यासाठी माजी सैनिक महामंडळाच्या वतीने १५ सुरक्षारक्षक व एक सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे सर्व जण तीन शिफ्टमध्ये सेवा बजावतात. ३१ मार्च २०२१ अखेर या सुरक्षारक्षकांच्या सेवा कंत्राटाची मुदत संपली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या कंत्राटाला मुदतवाढ देण्याबाबतचा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.
१ एप्रिल ते ३१ मार्च अशी वर्षभराच्या कालावधीसाठी या सुरक्षारक्षकांची नेमणूक माजी सैनिक महामंडळाच्या वतीने करण्यात येते. सर्व शासकीय इमारती किंवा शासकीय संस्थांना याच मंडळाकडून सुरक्षारक्षक पुरवले जातात. शासकीय नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांना लागणाऱ्या सुरक्षारक्षकांची नेमणूक खासगी अभिकरणातून न करता याच माजी सैनिक महामंडळातील माजी सैनिकांकडून करण्याची तरतूद आहे. मागील वर्षी या सुरक्षारक्षकांच्या मानधनाकोटी वार्षिक ६० लाख ३० हजार रुपये तरतूद करण्यात आली होती, मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात महागाई भत्ता विचारात घेता ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस निधीमधून ही तरतूद करण्यात येते.