मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार: गरोदर असल्याने उपचार सुरू
By सुदाम देशमुख | Published: November 17, 2022 09:40 PM2022-11-17T21:40:41+5:302022-11-17T21:40:53+5:30
चार महिन्यांपूर्वीची घटना, तरुणीच्या जबाबावरुन गुन्हा दाखल
अहमदनगर : नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर शिर्डीत पाच नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या जबाबावरून येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडिता ही मनोरुग्ण असून, १४ जुलै २०२२ रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती. ती शिर्डीत आल्यानंतर साईबाबा मंदिर परिसरात थांबली होती.
तिथे पाच तरुण तिला भेटले. त्यांनी तिला जेवण देतो, असे सांगून एका खोलीत नेऊन तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केला. ही घटना चार महिन्यांपूर्वीची आहे. पीडितेवर अत्याचार झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर जबाबावरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मनोरुग्ण असल्याचा फायदा घेत पाच नराधमांनी पीडितेवर वारंवार अत्याचार केला. यामधून ती चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेवर नगरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास एमआयडीसीचे उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, पीडितेचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने व घटना गत चार महिन्यांपूर्वीची असल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
एसपी ओला शिर्डीत दाखल
गुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी गुरुवारी शिर्डीत दाखल झाले होते. पीडितेवर मंदिर परिसरातच अत्याचार झाल्याने लॉज, हॉटेल्सची माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.