विद्यार्थ्यांचा ‘दक्षम’ करणार ध्वज दिन निधी संकलनाची जनजागृती
By साहेबराव नरसाळे | Published: December 8, 2023 08:00 PM2023-12-08T20:00:53+5:302023-12-08T20:01:13+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केले लघुपटाचे प्रदर्शन
अहमदनगर: देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या परिवारासाठी ध्वज निधी जमा करण्यात येतो. शाळा, महाविद्यालये व नागरिकांकडून हा ध्वजनिधी जमा करण्यात येतो. या ध्वजनिधीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळावा व शहीद जवानांच्या परिवारासाठी मोठा निधी जमा व्हावा, या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी नगर तालुक्यातील हमीदपूर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘दक्षम’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्त ७ डिसेंबर रोजी हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
"दक्षम" या लघुपटाच्या प्रदर्शनावेळी जिल्हाधिकारी सालीमठ, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. या लघुपटाचे दिग्दर्शन वैभव वैराळ यांनी केले असून, लेखन रोहित वाघ यांनी केले आहे. धीरज गायकवाड यांनी सहदिग्दर्शन केले आहे. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी मार्गदर्शन केले.
या लघुपटात गणेश नरवडे, रामेश्वर भापकर तसेच हमीदपूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मयंक खेसे, श्रमिक खेसे, दुर्वा कांडेकर, अनया खेसे, आराधना वैराळ, शिक्षक अजय पवार व रीना रायकर यांनी भूमिका केल्या आहेत. सहाय्यक कलाकार म्हणून प्राथमिक शिक्षक वसंत शिंदे व वैशाली गवळीकर यांनी भूमिका केल्या आहेत. चित्रीकरणासाठी हरीश टेमकर, बापू वैराळ, संकेत वाघमोडे, भानुदास महांडुळे, सोनाली खेसे, कल्पना कांडेकर, शिवाजी खेसे, ओम बेरड, साधना कांडेकर, संदीप कांडेकर, अशोक पाडळे, हिंगणगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व हमीदपूर ग्रामस्थांनी सहकार्य केले. यूट्यूबवर हा लघुपट सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, असे अजय पवार यांनी सांगितले.