अकोले तालुक्यात ३१ मेपर्यंत जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:04+5:302021-05-16T04:19:04+5:30

अकोले : तालुक्यात व शहरात कोरोनाबाधितांचा तीव्र वेगाने वाढणारा आकडा लक्षात घेऊन सजग नागरिक, व्यापारी व प्रशासन यांनी शुक्रवारी ...

Public curfew in Akole taluka till May 31 | अकोले तालुक्यात ३१ मेपर्यंत जनता कर्फ्यू

अकोले तालुक्यात ३१ मेपर्यंत जनता कर्फ्यू

अकोले : तालुक्यात व शहरात कोरोनाबाधितांचा तीव्र वेगाने वाढणारा आकडा लक्षात घेऊन सजग नागरिक, व्यापारी व प्रशासन यांनी शुक्रवारी एकत्रितपणे दिनांक १५ ते ३१ मेपर्यंत अकोलेत जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे.

शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. आता आर्थिक दंड नाही. गेल्या चार दिवसांपासून तालुक्याचा कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी तब्बल ५९५ कोरोनाबाधित आढळले असून, तालुक्यात आजपर्यंत १ हजार ३६७ सक्रिय कोविड रूग्ण आहेत. शुक्रवारी ३७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ९,४२६ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले. यापैकी ७,९६१ जणांनी कोरोनावर मात केली. १०८ जण कोरोनावर मात करु शकले नाहीत. ८४.३६ टक्के कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असून, मृत्यूदर १.१५ इतका आहे.

कोविड-१९चा विळखा वाढत चालला आहे. नागरिक लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून खरेदीच्या नावाखाली बाजारपेठेत विनाकारण फिरताना व गर्दी करताना दिसत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, अकोलेकरांनी १५ दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांची तसेच कोविड नियम तोडणाऱ्या दुकानदारांची गय केली जाणार नाही, असे एका प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अजूनही नगरहून अकोल्यात कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई होत आहे. दिनांक ४ व ५ मे रोजीचे कोरोना चाचणी अहवाल नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यानंतरचे अहवाल मिळाले. तालुक्यातील रूंभोडी येथील एकाचा ४ मे रोजी स्वॅब घेण्यात आला. या आजारात उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला, पण अहवाल नगरहून अकोलेत प्राप्त झाला नाही. त्याच्या मृत्यूचे कारण कुटुंबाला गुरुवारपर्यंत कळलेले नाही.

Web Title: Public curfew in Akole taluka till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.