शनिवारी, रविवारी कर्जतमध्ये जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:30+5:302021-06-11T04:15:30+5:30
कर्जत : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या ...
कर्जत : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिकांनी शहरातील दुकाने दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवायचा निर्णय घेतला. तसेच शनिवारी, रविवारी कर्जत शहरातील सर्व व्यापार पेठ पूर्णपणे बंद ठेऊन जनता कर्फ्यू पाळण्याचा ही निर्णय घेण्यात आला. ३० जूनपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसे निवेदन व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना दिले आहे.
यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन भोज, उपाध्यक्ष प्रसाद शहा, खजिनदार संजय काकडे, सचिव बिभीषण खोसे, विजय तोरडमल, अभय बोरा, संतोष भंडारी, राजेंद्र बोरा, मिलिंद बागल, अभिषेक बोरा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी आघाडी उपाध्यक्ष प्रसाद शहा म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयानक होती. या काळामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, नागरिक, व्यापारी यांनी अतिशय संयम दाखविला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात अगोदर कर्जत तालुक्यामध्ये काेरोना लाट आटोक्यात आली. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यापारी आघाडीच्या वतीने दररोज सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळामध्ये सर्व दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शनिवारी, रविवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यावेळी सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, तसे निवेदन प्रशासकीय अधिकारी यांना दिले आहे. तरी सर्व व्यापारी बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
----
नागरिक, व्यापारी घेतात काळजी..
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्यानंतर नागरिक, व्यापारीही कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला मास्क असते. फिजिकल डिस्टन्सिंगचे ही पालन केले जाते. तसेच आवश्यक ठिकाणी हाताला सॅनिटायझर ही लावले जात आहे. एकूणच येथील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक काळजी घेताना दिसून येत आहेत.