कर्जतला मिळणार ७० वर्षांनी शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:05 PM2018-05-09T21:05:37+5:302018-05-09T21:05:54+5:30
तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
कर्जत: तब्बल ७० वर्षानंतर कर्जतकरांना जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया झालेले शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे.
कर्जत नगरपंचायतीचा २८ कोटी रूपये खर्चाचा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. कर्जतच्या पाणी प्रश्नासाठी अनेक आंदोलने झाली. अनेक राजकीय पक्षांनी आम्ही पाणी देतो, तुम्ही आम्हाला मतदान करा, असे म्हणत अनेक निवडणुका जिंकल्या. मात्र गेल्या ७० वर्षांमध्ये कर्जतकरांना पाण्यासाठी भटकंतीच करावी लागली. कर्जतसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अजून झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी राज्यात भाजप आल्यानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नातून कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षपदी भाजपचे नामदेव राऊत यांची निवड झाली. नगरपंचायतीचा कारभार हाती घेताच त्यांनी पालकमंत्री शिंदे यांच्याकडे कर्जतच्या पाणी पुरवठा योजनेचा विषय प्रथम प्राधान्याने मांडला. पालकमंत्र्यांनी प्रस्ताव तयार करून तो सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी त्यांचे वजन वापरून कर्जतच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवून दिली.
राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून २८ कोटी रूपये मंजूर केले. नगराध्यक्षांनी या कामाकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करून घेतले आहे. केड येथील भीमा नदीच्या पात्रात दोन विहिरी घेऊन त्यावर २२० अश्वशक्तीच्या दोन वीज मोटारी बसविल्या आहेत. येथून हे पाणी राशीन मार्गे ३३ किलोमीटर जलवाहिनीद्वारे कर्जतला आणले आहे. कर्जत येथे ५ दशलक्ष क्षमतेचा हा प्रकल्प उभारला आहे. गावठाण, जोगेश्वरवाडी व समर्थनगर येथे प्रत्येकी एक अशा तीन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. कर्जत शहर व उपनगरांना पाणी पुरवठा करण्यासाठी ५२ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. घरगुती नळ जोड देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पाणी पुरवठा योजनेची चाचणी यशस्वी झाली आहे.