पूरमुक्तनगर ठरतेय दिव्यस्वप्नच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:02+5:302021-05-21T04:22:02+5:30
अहमदनगर : भौगोलिक रचना आणि शहरातून वाहणारी सीना नदी, यामुळे नगर शहर व परिसरात दरवर्षी पाणी तुंबते. त्यात काँक्रिटीकरणामुळे ...
अहमदनगर : भौगोलिक रचना आणि शहरातून वाहणारी सीना नदी, यामुळे नगर शहर व परिसरात दरवर्षी पाणी तुंबते. त्यात काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी मुरण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नगर शहरात पाणी तुंबण्याची अनेक कारणं आत्तापर्यंत समोर आली आहेत. पण, नगर शहर पूरमुक्त होणे हे दिव्यस्वप्नच राहिल्याचे मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या वर्षी शहर व परिसरातील ८ ते १० ठिकाणी पाणी तुंबले होते. सावेडी व सारसनगर भागात तर नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते.
पावसाळ्यापूर्वी मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात अपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक होते. चालूवर्षी ५ मे रोजी बैठक घेऊन आयुक्तांना पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले. बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने ओढे व नाल्यांतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून, दाेन जेसीबीद्वारे हे काम सध्या सुरू आहे. मात्र जून महिना सुरू होण्यास अवघे दहा दिवस उरलेले आहेत. यासंदर्भात महापालिकेकडे विचारणा केली असता सध्या दोन जेसीबीद्वारे नालेसफाईचे काम सुरू असून, आणखी दोन जेसीबी पुढील दोन दिवसांत उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. शहर व परिसरातील लहान मोठ्या नाल्यांची सख्या जवळपास २० इतकी आहे. यापैकी निर्मलनगर व नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारत परिसर, अशा दोन नाल्यांतील गाळ काढण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. उर्वरित १८ ओढे, नाले अजून स्वच्छ करायचे राहिलेले आहेत. हे नाले येत्या दहा दिवसांत स्वच्छ करण्याचे आव्हान महापालिकेच्या बांधकाम विभागासमोर आहे. त्यात शहरातील गटारींची स्वच्छता कामगारांमार्फत केली जाते. या कामाचा कार्यारंभ आदेश नुकताच देण्यात आला आहे. हे काम अजून सुरू झालेले नाही. पुढील दोन दिवसांत हे काम सुरू होईल, असे सांगण्यात आले. पावसाळ्यात गटारी तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसते. मागील वर्षी दिल्लीगेट येथील नीलक्रांती चौकात नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. तसेच भिंगारनाला, गावडेमळा आणि बोल्हेगाव येथील गणेश चौकातील दुकानांत पाणी तुंबले होते.
.....
या ठिकाणी तुंबते पाणी
-बोल्हेगाव येथील गणेश चौक
- कल्याणरोड येथील शिवाजीनगर
- सारसनगर येथील भिंगारनाला
-बालिकाश्रमरोड परिसरात
- गुलमोहररोडवर परिसरातील आनंद शाळेसमोर
- सावेडी उपनगरातील गावडेमळा,
......
गटारींच्या स्वच्छतेसाठी १२० कामगार
महापालिकेच्या स्वच्छता विभागाने चार प्रभाग समिती कार्यालयास प्रत्येकी ३० कामगार, याप्रमाणे कामगारांची नेमणूक केली आहे. या कामगारांकडून गटारी स्वच्छतेचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे. हे कामगार दोन महिन्यांसाठी रोजंदारीवर घेण्यात आले असून, पावसाळयात पाणी तुंबणाऱ्या भागातील गटारी प्राधान्याने स्वच्छ केल्या जाणार आहेत.
......
- शहर व परिसरातील ओढे व नाल्यांतील गाळ काढण्याचे काम जेसीबीच्या साहाय्याने सुरू करण्यात आली आहेत. सावेडी उपनगरातून कामाला सुरुवात झाली आहे. या कामाला गती मिळावी, यासाठी आणखी दोन जेसीबी ठेकेदाराकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
- सुरेश इथापे, शहर अभियंता, महापालिका
....
- पावसाळ्यापूर्वीच्या कामांचे नियोजन करण्यासाठी ५ मे रोजी आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक झाली. या बैठकीत ओढे नाले व गटारी स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गटारी व ओढे नाले स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुळे ही कामे करण्यास काहीसा विलंब झाला आहे. परंतु, ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
- शंकर मिसाळ, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख