सीईओंच्या दालनात धक्काबुक्की : सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 03:59 PM2019-05-29T15:59:58+5:302019-05-29T16:01:06+5:30
सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी सदस्य सुनील गडाख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या दालनात आंदोलन केले.
अहमदनगर : सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी सदस्य सुनील गडाख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या दालनात आंदोलन केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता खाजेकर यांना सोनई करजगावसह 18 गावांमधील लाभार्थ्यांनी धक्काबुक्की करण्याचा प्रकार आंदोलनादरम्यान घडला. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत चालविण्यात येत आहे. मात्र प्राधिकरणकडून ही योजना नियमित चालविण्यात येत नाही. त्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना ऐन दुष्काळात पाणी मिळत नाही. ही योजना हस्तांतरण करून घ्यावी किंवा योजनेचे वीज बिल जिल्हा परिषदेने भरावे, अशी मागणी प्राधिकरणाने केली होती. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे तसेच योजनेच्या कामाची चौकशी सुरू असल्यामुळे योजना हस्तांतरण करण्यास व वीज बिल भरण्यास जिल्हा परिषदेने यापूर्वीच नकार दिला आहे. तर प्राधिकरणनेही ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे योजनेवरील गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
योजनेतून नियमित पाणी पुरवठा व्हावा, या मागणीसाठी सदस्य सुनील गडाख यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी गावांमधील सरपंचांनी आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्राधिकरणच्या अधिकारी खाजेकर यांना माने यांनी बोलावून घेऊन प्रश्न सोडविण्यास सांगितले. मात्र खाजेकर यांनी योजना चालविण्यासाठी प्राधिकरणकडे निधी नसल्याचे सांगत योजना हस्तांतरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यासाठी आग्रह धरला. यावरून आंदोलक व खाजेकर यांच्यात खडांजगी झाल्याचे सांगण्यात येत आहे.