दहशत माजविणा-यांची भाजपमध्ये रांग : सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:47 AM2018-12-04T10:47:57+5:302018-12-04T10:48:03+5:30
भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले.
अहमदनगर : भाजप हा आयात उमेदवारांचा पक्ष आहे. त्यांची वैयक्तिक संघटना शून्य आहे. पैसा, सत्ता आणि दबावाच्या जोरावर त्यांनी उमेदवार आयात केले. नगर शहरातही दहशत माजविणा-यांची या पक्षात रांग लागली आहे. केडगावचे आमचे उमेदवार त्यांनी दहशत करुन पळविले, अशी टीका काँग्रेसचे युवक नेते डॉ. सुजय विखे यांनी केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी ‘लोकमत’ फेसबुक लाईव्हमध्ये आपली भूमिका मांडली.कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपात कसे गेले? या प्रश्नावर ते म्हणाले, हा विषय अचानक घडला. ते कोतकर यांचे समर्थक होते. त्यांच्या आदेशाने ते भाजपात गेले. मात्र २४ तासात तिथे काँग्रेसने दुसरे उमेदवार दिले. भाजपने दबाव टाकून या लोकांना पक्षात घेतले.
दोन्ही कॉंग्रेस नगर शहरात दहशत करते या शिवसेनेच्या आरोपाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, दहशत कोण करतेय हे शिवसेनेने नावानिशी सांगावे. दहशत करणारे आज निवडूनच येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. लोक अशा दादांना पराभूत करतात. आपणही दहशतीला कधीच मदत करणार नाही. दहशतीपेक्षा काम करणे महत्त्वाचे आहे. संग्राम जगताप, संदीप कोतकर, सुवर्णा कोतकर यांनी शहरात चांगले काम केले म्हणूनच लोकांनी त्यांना स्वीकारले. संदीप कोतकर आणि संग्राम जगताप हे महापौर असताना आघाडीच्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला आला, हीही बाब लक्षात घ्यावी लागेल. केवळ टीका करणे गैर आहे.
गांधी यांना शून्य गुण
खासदार दिलीप गांधी यांना त्यांच्या कामाबद्दल किती गुण द्याल, असा प्रश्न केला असता विखे म्हणाले, शून्यापेक्षाही कमी गुण देईल. भाजप आज शहरात विकासाचे फलक लावत आहे. मग, आजवर त्यांनी काय दिले लावले? हेही सांगावे.
महापौर पदाचे उमेदवार जाहीर करा
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी महापौर पदाचे उमेदवार जाहीर होणे आवश्यक आहे. लोक एकतर महापौर पदाचा चेहरा पाहून मतदान करतात किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार पाहून. कॉंग्रेस कमी जागांवर लढत असल्याने आम्ही राष्टÑवादीच्या पाठिशी राहणार आहोत. शहरात आघाडीचा महापौर होणार हे निश्चित आहे.
आमच्याकडे शहर विकासाचे खाते नव्हते
विखे, थोरात हे मातब्बर नेते जिल्ह्यात असताना नगर शहर का सुधारले नाही? या प्रश्नावर विखे म्हणाले, आपल्या वडिलांकडे मंत्रिपद होते. मात्र, शहराचा विकास करता येईल असे नगरविकास किंवा गृहखाते नव्हते. ते असते तर वेगळे घडले असते. तरीपण आपले आजोबा व वडिलांमुळे आरटीओ कार्यालयाची जागा व इतर अनेक प्रश्न सुटले आहेत.
मी बोलू कोणाविरुद्ध
मी कोणाविरुद्ध बोलू, अशी माझी संभ्रमावस्था झाली आहे. दहावे आणि लग्न करणे ही निवडून येण्याची पात्रता नसली पाहिजे. विकास कामे करणे हीच खरी पात्रता आहे. राहाता तालुक्यात भरपूर कामे केली आहेत. कोणत्याही पक्षावर मला टीका करायची नाही. मात्र दुर्दैवाने मला भाजपवर टीका करावी लागते. मी कोणाविरुद्ध बोललो की मलाच त्रास होतो.
उड्डाणपूल हे केवळ भूत
‘वो स्त्री यहॉ मत आना’ या ‘स्त्री’ चित्रपटातील कथेसारखी उड्डाणपुलाची स्थिती आहे. वो उड्डाणपूल यहाँ मत आना. उड्डाणपूल हे केवळ भूत आहे. निवडणूक आली की हे भूत येते. उड्डाणपुलाचे फलक लावले. मात्र प्रत्यक्ष काय कार्यवाही झाली? सर्वे, भूसंपादन, याची कुठेच माहिती नाही. उड्डाणपूल जाऊ द्या, मात्र बाह्यवळण रस्त्याला २५ कोटी दिले तरी खूप काही होईल. या रस्त्याची आज काय दुर्दशा झाली आहे, हे आपण सर्वजण पाहतो आहोत. उड्डाणपूल करायचे काम हे महापालिकेचे नव्हे तर निवडून आलेल्या खासदारांचे आहे. केंद्राच्या निधीतूनच पूल झाला पाहिजे. महापालिकेची सत्ता आणि पुलाचा काहीही संबंध नाही. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्त्यांची कामे करीत आहेत. त्याअंतर्गत हा पूल आहे. त्यासाठी खासदारांनी पाठपुरावा केला पाहिजे. महापालिकेचे अनेक वर्षांचे बजेट एकत्र केले तरी पूल होणार नाही.
‘लोकमत’च्या मुलाखतींना तुफान प्रतिसाद
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या रोखठोक फेसबुक लाईव्ह मुलाखतींना तुफान प्रतिसाद मिळत आहे.
आ. संग्राम जगताप यांची मुलाखत साडे आठ हजारांहून अधिक फेसबुक वाचकांनी पाहिली.
अनिल राठोड यांच्या मुलाखतीला पहिल्या दोनच दिवसात सहा हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत.
सुजय विखे यांच्या मुलाखतीला पहिल्या चार तासात अडीच हजार ‘व्ह्युज’ मिळाल्या आहेत. नगर शहरात प्रथमच असा प्रयोग होत आहे. या प्रयोगाबद्दल वाचकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी ` lokmat Ahmednagar` या फेसबुक पेजला भेट द्या.