पेन्शनधारकांचा प्रश्न लोकसभेत मांडणार : सदाशिव लोखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:54 PM2018-07-07T15:54:42+5:302018-07-07T15:54:56+5:30
पेन्शनधारकांना दरमहा समाधानकारक पेशन मिळत नसल्याने चालू अधिवेशनात लोकसभेत लक्षवेधी मुद्दा मांडत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेला दिले.
अस्तगाव : पेन्शनधारकांना दरमहा समाधानकारक पेशन मिळत नसल्याने चालू अधिवेशनात लोकसभेत लक्षवेधी मुद्दा मांडत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेला दिले.
गुरुवारी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात या संघटनेने खासदार सदाशिव लोखंडे यांना विविध मागण्याचे निवेदन देत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले. देशात विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेल्या ६० लाख इपीएफ-९५ पेन्शनधारकांना अतिशय अल्प म्हणजे ५०० रुपयांपासून ते २५०० पर्यंतची पेन्शन सरकारकडून देण्यात येते. निमशासकीय संस्था, विविध महामंडळे, खासगी उद्योगधंदे, सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी आपली सेवा करीत असताना पगारातून दरमहा पेन्शन फंडसाठी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाला जमा केलेला असतो. तरी देखील चुकीच्या राबविण्यात आलेल्या योजनांमुळे पेन्शधारकांना समाधानकारक पेन्शन मिळत नाही, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी खा.सदाशिव लोखंडे यांच्याकडे केली. खा. लोखंडे यांनी संपूर्ण विषय समजून घेत आपली बाजू या अधिवेशनात नक्की मांडू, असे सांगितले. तसेच आपल्या शिष्टमंडळाची केंद्रीय कामगारमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी एक बैठक लावू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी याविषयी बोलणार, असे आश्वासन खा.लोखंडे यांनी संघटनेला दिले.