कर्जतमध्ये पहाटेपासूनच कोरोना लसीकरणासाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:13+5:302021-05-08T04:22:13+5:30
कर्जत : कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही, कोरोनाच्या तपासणीचा अहवाल वेळेत येत नाही, कोरोना लसीचे नियोजन नाही, आधी टोकन, ...
कर्जत : कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही, कोरोनाच्या तपासणीचा अहवाल वेळेत येत नाही, कोरोना लसीचे नियोजन नाही, आधी टोकन, तर आता ऑनलाइन नंबर, येथील आरोग्य विभागाचे नेमक काय चाललेय हेच कर्जतकरांना समजेना. त्यामुळे भल्या पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला उपजिल्हा रुग्णालयापुढे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी रांग लावून उभे राहत असून, नंतर त्यांना लस डोसविनाच घरी परतावे लागत आहे.
तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कर्जत व गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटर फुल झाले आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिक तालुक्यातील लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र, लसीकरण नियमितपणे होत नाही. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेक जण पहिल्या व दुसऱ्या डोससाठी रांगेत उभे राहतात. मात्र, लस मिळत नाही. ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीसाठी पहाटेच लसीकरण केंद्रांवर रांगेत उभे राहून लस न घेताच घरी परतत आहेत.
पहिला डोस, दुसरा डोस, १८ ते ४४ या वयोगटातील डोस यांचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला आहे. याबद्दल चौकशी केली असता नागरिकांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोनाची चाचणी केली जाते. मात्र, त्याचा अहवाल येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. या काळात अनेक जण बिनधास्तपणे फिरत असतात. त्यामुळे कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
तालुक्यातील मिरजगाव, चापडगाव, कुळधरण, बारडगाव सुद्रिक, राशीन याठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. मात्र, यामध्ये सातत्य नाही. यासाठी तपासणीची लॅब कर्जत येथे सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब क्षीरसागर यांनी प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.
--
(आम्ही पहिला डोस घेतला, दुसरा डोस घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहेत; पण येथे काहीच आलबेल नाही.)
-गोविंदराव भणगे,
कर्जत
--
दुसऱ्या डोससाठी लागणारी लस सध्या उपलब्ध नाही. ती उपलब्ध होताच ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे. त्यांना दिला जाईल. सध्या १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
-कुंडलिक अवसरे,
वैद्यकीय अधीक्षक, कर्जत
---
०७ कर्जत कोविड
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस दुसऱ्या डोससाठी महिला व पुरुषांची झालेली गर्दी.