मसापच्या अध्यक्षपदी रावसाहेब कसबे
By Admin | Published: April 26, 2016 11:16 PM2016-04-26T23:16:17+5:302016-04-26T23:24:45+5:30
अहमदनगर : अध्यक्षपदी संगमनेर येथील डॉ़ रावसाहेब कसबे यांची तर विश्वस्तपदी ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांची वर्णी लागली आहे़
अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेत नगरला प्रथमच संधी देत अध्यक्षपदी संगमनेर येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ़ रावसाहेब कसबे यांची तर विश्वस्तपदी ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांची वर्णी लागली आहे़
मसापच्या पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयात दोन दिवसांपूवी नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक झाली़ या बैठकीला संस्थेचे सदस्य जयंत येलूलकर व कवी चंद्रकांत पालवे उपस्थित होते़ संस्थेत तीन मुख्य विश्वस्तांपैकी दोन जागांवर माजी आमदार उल्हास पवार व भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ शिवाजी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले़ यावेळी विश्वस्तपदी यशवंतराव गडाख यांची निवड करावी, अशी आग्रही मागणी मसापच्या सावेडी शाखेचे कार्यवाहक जयंत येलूलकर यांनी केली़ येलूलकर यांनी सभेत गडाखांच्या नावाचा ठराव मांडून त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले़ या ठरावाला मसापचे येथील सदस्य चंद्रकांत पालवे यांनी अनुमोदन दिले़ या ठरावाला उपस्थितांनी मंजुरी देत गडाख यांच्या नावावार एकमत झाले़ दरम्यान, या सभेत बोलताना येलूलकर यांनी कार्यकारिणीच्या ठराविक अंतराने होणाऱ्या सभा केवळ पुणे येथे न घेता विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्याची सूचना मांडली़ त्यामुळे स्थानिक साहित्यिक, रसिक व सभासदांना कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल़ तसेच ग्रामीण भागात साहित्य चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने मदत होईल, असे येलूलकर म्हणाले़ त्यांच्या सूचना सभेत मान्य करण्यात आल्या़ (प्रतिनिधी)