अकोलेत रब्बी पेरा घटला, ज्वारी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:00+5:302021-02-16T04:22:00+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यात यंदा रब्बी हंगामात मोठी घट झाली असली, तरी उसाचा फड दुप्पट झाला आहे. मात्र, ...
कोतूळ : अकोले तालुक्यात यंदा रब्बी हंगामात मोठी घट झाली असली, तरी उसाचा फड दुप्पट झाला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्याची ओळख असलेल्या ज्वारीचा पेरा शून्य टक्के झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकेकाळी कोरडवाहू म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून नवी ओळख प्राप्त झाल्याने यंदाच्या रब्बी हंगामात उसाची लागवड थेट दुप्पट झाली आहे. गतवर्षी ५९६ हेक्टर होते यंदा (ऑक्टोबर ते जानेवारी) मात्र हे क्षेत्र १९३३.७० हेक्टर आहे. तर, महाराष्ट्रात ज्वारी पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगरातील अकोलेत ज्वारीचा पेरा शून्य टक्के झाला आहे. गतवर्षी तो २८.९० हेक्टरवर होता.
गतवर्षी केवळ २५ हेक्टरवर असलेली मसाला पिके यंदा दीडपट वाढली. ती थेट ७०.९० हेक्टरवर गेली. तर कांदा व भाजीपाला घटला आहे. तर गतवर्षी शून्य हेक्टर असलेली फळ पिके यंदा १४७.६५ हेक्टरवर गेली आहेत.
सरासरी रब्बी पेरा गतवर्षी २२६ टक्के होता. मात्र, यंदा हे क्षेत्र १९२.९२ टक्के म्हणजे सुमारे ३५ टक्के घटला आहे.