रब्बीचे खंडित झालेले आवर्तन पुन्हा मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:31+5:302021-01-23T04:20:31+5:30
कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर ...
कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर हे आवर्तन १५ जानेवारीला बंद करण्यात आले. त्यामुळे हे आवर्तन फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मिळावे. उन्हाळा आवर्तनाच्या तारखा घोषित कराव्यात, या मागणीचे नुकतेच शेतकरी तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी कोपरगाव पाटबंधारे उपविभागाकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले, मुळात सध्याचा कालावधी ऊसतोडणीचा व रब्बीच्या पिकांच्या आंबवणीचा असतो. त्यामुळे या कालावधीमध्ये शक्यतो शेतकरी पाणी कमी प्रमाणातच मागणी करतात. मुळात हे पाणी डिसेंबर २०२० मध्ये मिळणे अपेक्षित होते. ज्यावेळेस आपल्या विभागामार्फत कोपरगाव नगर परिषदेच्या विनंतीवरून पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळेस आम्ही आपल्या विभागात आवर्तन लगेच रब्बीला जोडून द्यावे, अशी विनंती निवेदनाच्या स्वरूपात केली होती. परंतु, त्या निवेदनाचा विचार झाला नाही. डिसेंबर महिन्यात पेरणीच्या काळातच जास्त पाण्याची आवश्यकता असते. परंतु, आवश्यक असणारे पाणी मिळाले नाही. सध्याचे रब्बीचे आवर्तन बंद झाले. त्यामुळे रब्बीच्या नियोजनातील पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्यात तीन आवर्तनांच्या पाण्यास धक्का न लावता रब्बीच्या शिल्लक पाण्यातून १० ते १५ फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान शेतकऱ्यांना आवर्तन द्यावे. म्हणजे, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच प्रस्तावित उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, जेणेकरून उन्हाळी हंगामासाठी शेतकरी आपले बारमाही पिकांचे नियोजन करू शकतील.