अवकाळी पावसामुळे रबी धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:54+5:302021-01-09T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने थंडी अचानक गायब झाली आहे. वातावरणातील उकडा कमालीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने थंडी अचानक गायब झाली आहे. वातावरणातील उकडा कमालीचा वाढला असून, शुक्रवारी पहाटे शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस श्रीगोंदा व पाथर्डी तालुक्यात झाला. या अवकाळी पावसामुळे गहू व हरभरा आणि कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी स्थिती आहे. गुरुवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री अकाशात काळे ढग दाटून आले होते. परंतु, पाऊस पडला नाही. शुक्रवारी भल्यापहाटेच पावसाची रिमझिम सुरू झाली. तर सावेडी उपनगरात पावसाच्या सरी बरसल्या. सकाळी दहा वाजेपर्यंत रिमझिम सुरू होती. या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला. नगर तालुक्यातील काही भागात पाऊस झाला. कर्जत, नेवासा, संगमनेर, कोपरगाव आणि राहाता तालुक्यात प्रत्येकी एक मि.मी. पाऊस झाला. यापूर्वीचा पाऊसही चांगला आहे. त्यामुळे गहू, हरभऱ्याची पिके चांगली आली आहेत. मात्र, थंडी गायब होऊन ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे गहू व हरभरा पिकांवर कडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण जास्त काळ राहिल्यास रबीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल. सध्या ऊस तोडणी सुरू आहे. पावसामुळे ऊसतोडणीच्या कामातही अडथळा निर्माण होत आहे.
..
जिल्ह्यातील पाऊस
नगर- ०.३, मि.मी. पारनेर-०.७, श्रीगोंदा-२.८, कर्जत- १.२, जामखेड-०.२, शेवगाव-०.८, पाथर्डी-२.६, नेवासा-१.४, राहुरी-०.८, संगमनेर-१. ३, अकोला- ०.२, कोपरगाव-१.०, श्रीरामपूर-०.७, राहाता-१.५, अहमदनगर-१.१