बंदोबस्तात लुटणा-या टोळीचे राज्यभर रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:21 AM2018-09-30T11:21:37+5:302018-09-30T11:21:44+5:30
पोलीस बंदोबस्तात तोतयेगिरी करीत कधी अधिकारी तर, कधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असल्याचा आव आणून व्यापाऱ्यांना गंडविणाºया टोळीचे रॅकेट राज्यभर पसरले आहे
श्रीगोंदा : पोलीस बंदोबस्तात तोतयेगिरी करीत कधी अधिकारी तर, कधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असल्याचा आव आणून व्यापाऱ्यांना गंडविणाºया टोळीचे रॅकेट राज्यभर पसरले आहे. श्रीगोंद्यात या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर पाथर्डीतही असाच प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता हे प्रकरण विधानसभेत गाजणार आहे.
भेसळयुक्त व बनावट माल दुकानात ठेवल्याच्या नावाखाली राज्यातील सुमारे दोनशे व्यापाºयांना लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार जामखेड येथील अभय बाफना असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे. तो जामखेड येथील व्यापारी आहे. त्याने व्यापाºयांच्या विक पॉर्इंटचा अभ्यास केला. भेसळ व बनावट मालाच्या नावाखाली दुकानदारांना लुटण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याची नामी शक्कल त्याने लढविली. पोलिसांना आम्ही सामाजिक संस्थांसाठी काम करीत असून तुम्हाला दोन नंबरचा माल पकडून देतो, असे आमिष दाखवत पोलीस यंत्रणा गळाला लावली. लुटीचा डाव यशस्वी झाला की, पोलिसांना मलिदा मिळू लागला. त्यामुळे पोलिसही या टोळीच्या प्रेमात पडले. त्यातून खºया पोलिसांना सोबत घेऊन या तोतयांनी अनेक व्यापाºयांना गंडा घातला. एका व्यापाºयाला लुटण्याच्या मोहात अभय बाफना, कुंदनसिंह काहाटे श्रीगोंद्यात पकडले गेले. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीने चार पोलिसांचा बंदोबस्त घेऊन व्यापाºयास गंडविले. पण आपलेच पोलीस बांधव या प्रकरणात सापडणार हे लक्षात येताच पोलिसांनी या भामट्यांच्या विरोधात कडक भूमिका घेतली नाही. त्यामुळे या तोतयांच्या टोळीचे जास्तच फावले.
पोलीस बंदोबस्तात व्यापाºयांना लुटण्याच्या घटनांमुळे राज्यातील व्यापारी अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आमदार राहुल जगताप, आमदार मोनिका राजळे यांची भेट घेऊन या प्रकरणात भामट्यांना साथ देणाºया पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण विधानसभेत गाजणार निश्चित आहे.
पोलिसांनी कारवाई करण्याची गरज
नगर जिल्ह्यातील पोलिसांनी या टोळीला मदत केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक
रंजनकुमार शर्मा यांनी या टोळीला पोलीस बंदोबस्त कसा दिला? कोण कोण पोलीस गेले? याची माहिती घेऊन संबधितांच्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे.