शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:47+5:302021-07-01T04:15:47+5:30
महापौरपदी रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी शिवसैनिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन ...
महापौरपदी रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शहरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी शिवसैनिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, बबलू शिंदे, नीलेश भाकरे यांच्यासह सेनेचे आजी-माजी नगरसेवक व काही पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काहीजण नशेत तर्रर्र झाले होते. आर्थिक देवाण-घेवाणीवरून सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. यावेळी नीलेश भाकरे यांना काही जणांनी मारहाण केली. नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम व मुंबईतील एका पदाधिकाऱ्यालाही धक्काबुक्की झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर रात्री उशीरा नीलेश भाकरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अर्ज देऊन मला नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, अनिल शिंदे यांची मुले, त्यांचा भाऊ बबलू शिंदे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
-------------------------
घटनेनंतर व्हिडिओ व्हायरल
हॉटेलमध्ये शिवसैनिकांमध्ये राडा झाल्यानंतर या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात एका व्हिडिओमध्ये काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत, तर दुसरा व्हिडिओ नीलेश भाकरे यांचा असून यात ते म्हणतात की, ‘मी मुख्यमंत्र्यांच्या दारात महापौर निवडणुकीतून माघार घेतली होती. मला मारहाण करण्याचे काही कारण नव्हते. मात्र, नगरसेवक अनिल शिंदे यांनी मला दारू पाजली व संभाजी कदम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली’.
---------------------
नीलेश भाकरे यांनी मंगळवारी रात्री पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देऊन काही जणांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. या संदर्भात भाकरे यांचा सविस्तर जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
- राकेश मानगावकर, पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन