बाळासाहेबांच्या विरोधानंतरही राधाकृष्ण विखेंची भाजपला मदत : अशोक विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:31 PM2019-04-26T12:31:49+5:302019-04-26T12:33:26+5:30
दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या.
अहमदनगर: दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या. शिवसेनेत जाण्याचा प्रस्ताव त्यांचाच होता. विरोधी पक्षनेते असतानाही ते भाजपात उपमुख्यमंत्री बनायला निघाले होते. बाळासाहेबांनीच त्यांना थांबविले होते. मात्र, या माणसाने अखेर जातीयवादी पक्षांची साथ केलीच. ही बाळासाहेब विखे यांच्या विचाराशीही प्रतारणा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी केली आहे.
अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात उघड राजकीय भूमिका घेतली आहे. नगर मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या प्रचारात सहभागी होत शरद पवार यांच्यासमोर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राधाकृष्ण यांच्यावर टीका केली होती. गुरुवारी ते श्रीरामपूर येथे कॉंग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते.
या सभेत ते म्हणाले, मंत्रिपद मिळत होते म्हणून राधाकृष्ण हे शिवसेनेत गेले. पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. कॉंग्रेसने त्यांना मंत्रिपद दिले. विरोधी पक्षनेतेपदाचा सन्मान दिला. मात्र, या पदावर असतानाच ते भाजपच्या संपर्कात होते. मध्ये ते भाजपमध्येही चालले होते. तेथे त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, मी आयुष्यभर जातीयवादी पक्षांना विरोध केला असल्याचे सांगत दिवंगत बाळासाहेब विखे यांनी त्यांना थांबविले. मात्र, स्वार्थासाठी राधाकृष्ण यांनी आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवत भाजपशी घरोबा केलाच. शरद पवार व आमच्या कुटुंबाचे काहीही वैर नाही. राधाकृष्ण हे तसा दिखावा निर्माण करत आहेत.
बाळासाहेब थोरात यांनी पक्षनिष्ठा बाळगून दोन वेळा शालिनी विखे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. एकदा तर राधाकृष्ण विखेंनी आश्वासन देऊनही हे पद थोरात गटाला दिले नाही. त्यांचे संपूर्ण राजकारण हे स्वार्थी व अविश्वासाचे आहे, असे अशोख विखे पाटील या सभेत म्हणाले.
मुळा प्रवरा वीज संस्थेत घोटाळा आहे. मात्र, हे सरकार तक्रारींची दखल न घेता याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.