उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्वर ओक मध्येच - राधाकृष्ण विखे पाटील
By सुदाम देशमुख | Published: April 16, 2023 05:49 PM2023-04-16T17:49:01+5:302023-04-16T17:50:39+5:30
उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्वर ओक मध्येच असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर : स्वातंत्र्यवीर सावकरांचा काॅग्रेस नेत्यांकडून होत असलेला अपमान उध्दव ठाकरे शांतपणे बघत असल्याचे आश्चर्य वाटते. सतेसाठी विचार सोडणा-या उध्दव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओक असल्याने स्वत:चे मत व्यक्त करण्याचे धैर्य देखील त्यांच्यात राहिले नसल्याची टिका महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू असल्यातरी,ही वज्रमूठ केव्हा सैल होईल यांना कळणार नाही. महाविकास आघाडीत सुरू झालेले मतभेद पाहाता तीन पक्षांचे नेतेच भविष्यात एकमेकांवर मूठ उगारल्या शिवाय राहाणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.
वज्रमूठ सभांवर टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, की, विरोधकांकडे कुठलाही अजेंडा नाही त्यामुळे ते अशा वज्रमूठ सभा घेत फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सता गेल्याने वैल्यग्रस्त झाले असून, उद्धव ठाकरे यांचा रिमोट कंट्रोल आता सिल्वरओकवर असल्याने ते स्वताचे मतही आता मांडू शकत नाहीत.
महाविकास आघाडीने प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा सल्ला देत विखे म्हणाले की, महाविकास आघाडी फक्त व्यक्तिद्वेषाने पछाडली आहे.खालच्या पातळीवर जावून टीका करण्याचे काम त्यांच्याकडून होत असून, स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर टीका करणारे राहुल गांधी यांच्या करिता आता मातोश्रीवर लाल कार्पेट टाकण्याची तयारी सुरू आहे. सावकरांवरील टिका सहन करत त्यांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे सभा घेत बसणार असतील तर हे कुठले हिंदुत्व ? असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी केला.
रोज हे सरकार पडेल अशी विश्व प्रवक्त्यांची भविष्यवाणी हास्यास्पद असून सध्या महाविकास आघाडीत भविष्यकारांची संख्या वाढली आहे. अजित पवार यांचे भाजपशी अलीकडच्या काळात नाव जोडले जात असून यात किती तथ्य आहे यावर बोलताना ते म्हणाले की या बाबत अजित पवार हेच अधिक सांगू शकतील. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून एकही शेतकरी मदती पासून वंचित राहणार नाही असे सांगितले. जिल्हा प्रशासनास तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून यावर कार्यवाही सुरू असल्याचे शेवटी विखे पाटील यांनी सांगितले.