“ठाकरे सरकारमध्ये मंत्री तुपाशी, जनता उपाशी; भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले”; भाजपचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:07 AM2021-11-05T00:07:35+5:302021-11-05T00:08:14+5:30
महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात येत आहेत.
शिर्डी:महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात येत आहेत. या मुद्द्यावरूनही विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी कमी होताना पाहायला मिळत नाही. यातच आता महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचे सगळे विक्रम मोडले असून, या कालावधीत जनता उपाशी आणि मंत्री मात्र तुपाशी, या शब्दांत भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) केली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यात सपत्निक लक्ष्मीपूजन केले. आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे, माहीत नाही. मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला आहे.
महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चाललाय
राज्यातील सामान्य नागरिक, शेतकरी अडचणीत आहेत. पण महसूल गोळा करण्यात मंत्र्यांचा वेळ चालला आहे. शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली आहे, अशी टीका केली. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केल्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्राने जीएसटी थकवला ही वस्तुस्थिती नसून राज्यातील मंत्र्यांचा केंद्राकडे बोट दाखवण्याचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. आपल्या दिव्याखाली अंधार आहे ना, राज्यातील मंत्र्यांनी भ्रष्टाचारातून थोडे बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, या शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुनावले आहे.
भ्रष्टाचाराचा उच्चांक महाविकास आघाडीने मोडला
राज्य सरकारने कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मदत केली नाही. राज्याने केवळ पाहण्याची भूमिका पार पाडली. राज्य सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी ठरले आहे. केवळ दिवसागणिक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा सगळा उच्चांक महाविकास आघाडीने मोडला असल्याचा घणाघात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.