राधाकृष्ण विखे म्हणतात...राहुल गांधींचे विधान दुटप्पी; काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 03:45 PM2020-05-27T15:45:22+5:302020-05-27T15:57:46+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
लोणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर बुधवारी राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रीया दिली. राहुल गांधी यांचे विधान हे दुटप्पी आहे. सरकारमध्ये रहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही असे जाहीरपणे सांगायचे? मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला? तत्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे. सत्तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची. असे दोन्ही बाजूने बोलायचे असे कसे चालेल? असा सवालही विखे यांनी केला.
राज्यात एवढे मोठे संकट उभे आहे, मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या परिस्थितीला सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत आला आहे. असे असताना सुध्दा खासदार राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्तीगत अडचणी असतील. त्यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत. परंतू बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत? याचे कोडे राज्यातील जनतेला उलगडलेले नाही, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून २८ हजार कोटी रुपयांची मदत देवू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले? याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही विखे यांनी केली.