राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय म्हणतात, मी कोणत्याच पक्षाचा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:32 PM2018-02-23T15:32:03+5:302018-02-23T15:53:47+5:30
मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.
केडगाव : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची पुरती वाताहात झाली आहे. लोक माझ्याकडे अडचणी घेऊन येतात. मी कोणत्याच पक्षाचा नाही. यामुळे कोणत्याही पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्याचे काम करण्यास मी सदैव तयार असतो, असे काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे पुत्र आणि शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.
जनसेवा फाउंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित डॉ. विखे पा. मेमोरियल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज विळद घाट यांच्या संयुक्त विद्यमाने चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते.
विखे म्हणाले, नगर तालुक्यासारख्या जिरायत भागातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्याचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. आरोग्य शिबिरासाठी दोन वर्ष सर्वे केला. वर्षभरात ७५ शिबिरे घेणार आहे. अल्पदरात सेवा देणारे रुग्णालय महणजे विखे हॉस्पिटल आहे, असे डॉ. सुजय विखे म्हणाले.
यावेळी संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, मनोज कोकाटे, दत्ता पाटील नारळे, विनायक देशमुख,अशोक कोकाटे, बाळासाहेब हराळ, केशव बेरड, दत्तात्रय सदाफुले, आबासाहेब कोकाटे, सरपंच अंजना पवार, शरद पवार, संजीवन गडाचे भारती महाराज, अर्चना चौधरी, राजेंद्र कोकाटे, संतोष कोकाटे, शारदा ठोंबरे, बाबासाहेब काळे, संजय गिरवले, अशोक मोरे उपस्थित होते.