श्रीरामपुरातील रहाटपाळणे पोलिसांनी केले बंद; विनापरवानगी सुरू होते खेळ
By शिवाजी पवार | Published: April 4, 2023 03:13 PM2023-04-04T15:13:29+5:302023-04-04T15:14:48+5:30
शिर्डी येथे रामनवमी यात्रोत्सवामध्ये रहाटपाळण्याचा अपघात होऊन मोठी दुर्घटना झाल्याने जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे.
शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि.अहमदनगर):शिर्डी येथे रामनवमी यात्रोत्सवामध्ये रहाटपाळण्याचा अपघात होऊन मोठी दुर्घटना झाल्याने जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीरामपूर येथे यात्रेनिमित्त नगरपालिकेच्या परवानविना सुरू असलेले रहाटपाळणे तातडीने बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शहरातील रासकरनगर येथील खासगी मैदानात श्रीरामनवमी यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या पाळणा चालकांना मंगळवारी नोटीस दिली. निरीक्षक गवळी यांनी पाळणाचालकांना तातडीने मंगळवारपासून खेळ बंद करण्याचे आदेश दिले.
शिर्डी येथे रहाटपाळण्याचा अपघात होऊन चार जण गंभीर जखमी झाले होते. दोघा जखमींना अपंगत्व आले होते. त्यामुळे तेथील पोलिसांनी पाळणा चालक तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. श्रीरामपूर येथे तर पालिकेने परवानगी नाकारलेली असतानाही खासगी जागेत पाळणे लावण्यात आले होते. तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे शिर्डीप्रमाणे येथे दुर्घटना घडू नये याकरिता पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. शहरात ३० मार्चपासून यात्रौत्सव सुरू झाला आहे. मात्र मंगळवारी पाळणे बंद करण्याची वेळ आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"