शेवगाव गोळीबारातील जखमींना प्रत्येकी एक लाखाची मदत- रावसाहेब दानवे यांनी नगरमध्ये शेतक-यांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 07:40 PM2017-11-16T19:40:26+5:302017-11-16T19:45:58+5:30
ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री ७.२५ वाजता नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.
अहमदनगर : ऊस दरावरुन पेटलेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी रात्री ७.२५ वाजता नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले.
गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील उद्धव मापारी व बाबूराव दुकळे यांच्यावर नगरमधील मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांना शासनाच्या स्तरावरुन आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी चर्चा केल्याचे दानवे यांनी सांगितले. तसेच आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शासकीय पातळीवरून मध्यस्थी करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. एफआरपीप्रमाणे भाव न देणाºया कारखान्यांविरोधात सरकारने कारवाई सुरु केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड उपस्थित होते.
शेवगाव तालुक्यातील खानापूर येथेही खासदार दानवे यांनी भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला़ यावेळी शेवगावचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, शेतकरी कृती समितीचे रावसाहेब लवांडे, दुर्गा थोरात यांनी भावना व्यक्त केल्या. औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड, तुषार शिसोदे, जि.प. सदस्य राहुल राजळे, बापूसाहेब भोसले, दिनेश लव्हाट, कचरू चोथे,सुभाष केकाण, मधुकर गोरे, जगन्नाथ भागवत, अण्णा जगधने, एकनाथ खोसे आदी उपस्थित होते.