राहीबाई पोपेरे करणार खासदारांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:41+5:302021-01-18T04:18:41+5:30
आपल्या मार्गदर्शनात गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणार आहेत. १९ जानेवारी रोजी राहीबाई पोपेरे ...
आपल्या मार्गदर्शनात गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणार आहेत.
१९ जानेवारी रोजी राहीबाई पोपेरे स्वत:च्या कार्याबद्दल माहिती लोकसभा सदस्यांना देतील. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले जाणार असून ते लोकसभा पोर्टलवर व चॅनलवर दाखवले जाणार आहे. भारत सरकारच्या संसदीय अभ्यास व प्रशिक्षण ब्युरो भारत सरकारच्या डायरेक्टर डॉ. सीमा कौल सिंह यांनी ही माहिती दिली.
यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केलेल्या व जगभर बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई यांनी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिली बीज बँक सुरू केली होती. बायफचे अध्यक्ष गिरीश सोहनी यांच्या हस्ते या बँकेचे उद्घाटन २०१४ मध्ये करण्यात आले होते. सातत्याने त्या गरीब शेतकऱ्यांसाठी बीजनिर्मिती व वितरण करत आहेत. त्यासाठी बायफ संस्थेच्या मदतीने कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन संस्था स्थापन करून त्यामार्फत राज्य आणि देशपातळीवरील बीज संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आलेले आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील मानाचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा नारीशक्ती पुरस्कार यापूर्वी प्रदान करण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सदस्यांना त्या मार्गदर्शन करणार आहेत.
...........................
रंगीत तालीम पडली पार
देशी बीज संवर्धन उपक्रमाची दखल देश आणि विदेशांंतही घेण्यात आलेली आहे. त्यानुसार गावोगावी प्रत्येक राज्यात देशी बियाण्यांच्या बँका शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यासाठी केंद्र शासन विशेष प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम डॉ. सीमा कौल सिंग यांच्या मार्गदर्शनाने १५ जानेवारीला घेण्यात आली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये बायफ संस्थेच्या वतीने विषयतज्ज्ञ संजय पाटील, विभागीय अधिकारी जितिन साठे सहभागी होणार आहेत.