नगर जिल्ह्यातील अनुभवातून खूप शिकलो-राहुल व्दिवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:09 AM2019-09-06T11:09:48+5:302019-09-06T11:10:22+5:30
नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : प्रत्येकाच्या जीवनातील जडणघडणीत त्याच्या गुरूचे स्थान अढळ असते. त्यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. परंतु माझ्या जडणघडणीत विशिष्ट एका शिक्षकाचे नाव घेता येणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्यांनी मला मार्गदर्शन केले तो प्रत्येकजण माझा गुरू आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे, दिल्ली, गोंदिया, भंडारा, वाशिम येथे सनदी अधिकारी म्हणून काम केले. परंतु नगर जिल्ह्यातील काम खूप आव्हानात्मक होते. राजकीय, सामाजिक, शासकीय अशा सर्वच बाबतीत काम करताना नगरमधून खूप शिकायला मिळाले. नगर जिल्हा ख-या अर्थाने माझा शिक्षक असून या शिक्षकाने शिकवलेला प्रत्येक धडा पुढील करिअरमध्ये कामी येणारा आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्यामध्ये एक शिक्षकही लपलेला आहे. आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांच्या कामी यावे, या उदात्त हेतूने त्यांनी वाशिम येथे जिल्हाधिकारी असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरकारी सुटी असताना वाशिम येथील नवोदय विद्यालयात जाऊन ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे देत. त्यामुळे आठ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. या कामामुळे त्यांनी वर्षभरात केवळ दोनच सुट्या घेतल्या. याबद्दल त्यांचे विशेष कौतुकही झाले. त्यांनी आयआयटीतील सहकारी मित्रांनाही या प्रशिक्षणासाठी बोलावले होते. एका सनदी अधिका-यातील शिक्षक त्यांच्या रूपाने येथे पहायला मिळाला.
खासगी नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास
माझे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे झाले. वडील खासगी नोकरी करीत होते. आई, वडील, भाऊ यांचे सततचे मार्गदर्शन असल्याने अभ्यासात चांगली रूची निर्माण झाली. परिणामी चेन्नई येथील आयआयटीत प्रवेश मिळाला. आयआयटीतून पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु तेथे मन रमेना म्हणून यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. २००६ मध्ये यूपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्ली गाठली. तीन वर्षे परिश्रम घेतल्यानंतर २००८मध्ये अखेर सिव्हील सर्व्हिसचे स्वप्न पूर्ण झाले. इथपर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर अनेकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यात सर्वच शिक्षक, आई, वडील, भाऊ यांचा वाटा होता. कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. आयुष्यातील या शाळेत शिपायापासून अधिकाºयांपर्यत प्रत्येकाकडून काहीना काही शिकायला मिळते. तो प्रत्येकजण तुमचा गुरूच असतो, असे सांगताना जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी शिक्षक दिनानिमित्त त्या सर्वांबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, ज्यांनी त्यांना घडवले.
अहमदनगर आव्हानात्मक जिल्हा...
राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जसा नगर जिल्हा मोठा आहे, तसेच नगरचे राजकीय, सामाजिकदृष्ट्या राज्यात वजन आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक होते. परंतु सर्वांच्या सहकार्याने हे आव्हान आपण लिलया पेलले. भविष्यात राज्यात कोणत्याही ठिकाणी काम करताना नगरचा भक्कम अनुभव कामी येईल. त्यामुळे नगर जिल्हा आपला खरा शिक्षक आहे, ज्याने खूप शिकवले, असे जिल्हाधिकारी अभिमानाने सांगतात.