वडिलांच्या वारशाला राहुलने दिली सुवर्णझळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:13 AM2018-04-13T11:13:07+5:302018-04-13T11:27:35+5:30
वडील बाळासाहेब आवारे यांच्या पावलावर पाऊल टाकत तालमीत उतरलेल्या राहुल आवारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून वडिलांकडून मिळालेल्या कुस्तीच्या वारशाला सुवर्ण झळाळी दिली.
संतोष थोरात
खर्डा (जि़ अहमदनगर) : वडील बाळासाहेब आवारे यांच्या पावलावर पाऊल टाकत तालमीत उतरलेल्या राहुल आवारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून वडिलांकडून मिळालेल्या कुस्तीच्या वारशाला सुवर्ण झळाळी दिली. राहुलने कॅनडाच्या कुस्तीपटूवर मात करताच माळेवाडी (ता़ जामखेड) व पाटोदा येथे राहुलच्या आई-वडिलांसह गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
राहुल आवारे याचा जन्म माळेवाडी (ता़ जामखेड) या दुर्गम खेड्यात २ जुलै १९८८ साली झाला़ राहुलचे वडील बाळासाहेब हे नामांकित मल्ल होते. राहुल पाच वर्षाचा असताना माळेवाडी येथील तालमीत वडिलांसोबत जायचा. वडिलांना कुस्ती खेळताना पहायचा. पुढे त्याचीही पावले तालमीच्या दिशेने पडायला लागली़ वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राहुल रोज सराव करायचा़ बीड, नगर, सोलापूर जिल्ह्यातील आखाड्यांमध्ये रेवड्यांच्या बक्षिसांवर तो कुस्त्या मारायचा. खर्डा येथील आखाड्यात पहिले अकरा रुपयांचे रोख बक्षीस पटकावून राहुलने विजयाचा श्रीगणेशा केला आणि पुढे अनेक सुवर्ण पदकांची लयलूट करीत त्याने वडिलांकडून मिळालेल्या
कुस्तीच्या वारशाला सुवर्ण झळाळी दिली.
आवारे कुटुंब १९९१-९२ साली पाटोदा (जि़ बीड) येथे स्थायिक झाले़ श्री भामेश्वर विद्यालयात राहुल शालेय शिक्षण घेऊ लागला. त्यावेळी टाकळीमानूर (ता. शिरूर, जि़ बीड) येथे शालेय स्तरावर १९९८-९९ साली तालुकास्तरावर त्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर जिल्हास्तरावरही सुवर्णपदक पटकावले आणि त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धा शेगाव (जि़ बुलढाणा) येथे झाली होती. त्या स्पर्धेत राहुलने द्वितीय क्रमांक पटकावला. माळेवाडी येथे कुस्तीचा पाया रचलेला राहुल पाटोदा, कोल्हापूर येथून प्रवास करत पुणे येथील गोकुळवस्ताद व्यायामशाळेच्या माध्यमातून आशियाई सब ज्युनियर गेम्समध्ये पोहोचला. २००७ मध्ये तैवान (चीन) येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिले पदक (कांस्य) पटकावले. २००८ साली उझेबेकिस्तानमध्ये झालेल्या कुमार आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सुवर्ण कामगिरीचा पाया रचला.
आमचे सर्व कुटुंबच कुस्तीत रंगलेले आहे. मी कुस्तीपटू होतो़ गोकुळ व राहुल दोघेही कुस्तीत नाव कमावत आहेत. राष्ट्रकुलमध्ये राहुलने सुवर्णपदक पटकावून मराठी पताका अटकेपार फडकावली आहे. त्याने देशाचा अभिमान व मान उंचावली आहे. आमच्या गेल्या २७ वर्षांच्या कष्टाचे पोराने चीज केले, अशा शब्दात बाळासाहेब आवारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राहुल सर्वांसाठी आदर्श
राहुल खूप जिद्दी आहे. तो खूप मेहनत करतो़ तो पदक मिळविणारच असा विश्वास आम्हाला होता. तो विश्वास त्याने सार्थ ठरविला. अधिक काय बोलावे, त्याच्या कामगिरीपुढे आमचे शब्द कमी पडत आहेत. ग्रामीण भागातील व गरिबीत वाढलेला राहुल आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पदक मिळवू शकतो, हा सर्वांसाठी मोठा आदर्श आहे, अशा शब्दात राहुलची आई शारदाताई यांनी गौरवोद्गार काढले.