कोतूळमध्ये अवैध दारू अड्ड्यांवर छापा; चार आरोपी अटक : ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 07:39 PM2018-01-16T19:39:09+5:302018-01-16T19:41:03+5:30
कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोतुळ : गेल्या काही महिन्यांपासून कोतुळ परिसरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्री करणा-या अड्ड्यांवर छापे टाकले. यात चार जणांना अटक करून ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सध्या कोतुळ परिसरात अवैध देशी दारूची विक्रीची साखळी निर्माण झाली आहे. यात अनेक जणांचे हात गुंतले आहेत. त्यातून मिळणा-या अफाट पैशातून गुंडगिरी देखील फोफावली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविल्यानंतर सामाजिक संघटना, महिला कार्यकर्त्यांनी अवैध दारूविरोधी लढ्यात उडी घेतली. पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या तक्रारीवरून कोतुळच्या इंदिरानगर परिसरात योगेश मोहिते व बसस्थानक परिसरात राजेंद्र खरात यांना देशी दारूच्या बाटल्या विकताना छापा टाकून पकडण्यात आले. त्यांच्याकडून पंचवीस लिटर देशी संत्रा व पंचवीस लिटर बॉबी देशी दारूसह दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ८१ हजार ९९५ रूपये आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. डी. परदेशी, दुय्यम निरीक्षक एन. सी. परते, डी. डी. चौरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दोन लाखांहून अधिक किंमतीची दारू जप्त
गेल्या दोन महिन्यात दोन लाखांहून अधिक रूपयांची अवैध देशी दारू पकडल्याने इथे हा गोरख धंदा किती फोफावला आहे, हे उघड झाले आहे. दारूबंदी समितीचे हेरंब कुलकर्णी यांच्या मंत्रालयात पर्यंतच्या पाठपुराव्यामुळे उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले आहे. मात्र ब्राह्मणवाडा, पिंपळगाव खांड , बेलापूर, चास, पिंपळदरी गावात देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.