शेवगावात पाच रेशन दुकानांवर छापा; शिल्लक धान्यसाठ्यात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:20 AM2020-05-06T11:20:39+5:302020-05-06T11:22:22+5:30
जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानात अचानक छापा टाकून तपासणी केली. या दुकानांमध्ये शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
शेवगाव : नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानात अचानक छापा टाकून तपासणी केली. या दुकानांमध्ये शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. याप्रकरणी संबंधित दुकानदारांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांत शासनाने मोफत धान्य उपलब्ध करून दिले आहे. मोफत धान्य वाटपातील गहू, तांदूळ वाटपावरून अनेकांनी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा पुरवठा शाखा यांचेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी २४ एप्रिल रोजी अचानक शेवगाव शहरात दाखल होत, स्वस्त धान्य दुकानांवर छापे टाकले. तेथे मोफत वाटप करण्यात येणा-या गहू व तांदूळ शिल्लक साठ्यात मोठी तफावत आढळून आली होती. संबंधितांना माळी यांनी यासंदर्भात खुलासा सादर करण्याचे आदेश देत शहरातील पाच दुकानांना सील ठोकले होते. ही कारवाई पंचांच्या समक्ष करण्यात आली होती. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नायब तहसिलदार मयूर बेरड यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश माळी यांनी दिले. त्यानुसार बेरड यांनी फिर्यादी होऊन सोमवारी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
स्वस्त धान्य दुकान क्रमांक २, ३, ६, ८, १० या दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये रंजना प्रकाश सुतार, अंबादास नामदेव खंडागळे, डी. बी. बिहाणी, पी.एच. गजभीव, बाबासाहेब नाईक, प्रितम नाईक, श्यामसुंदर धुत, गोपाळ धुत, संदीप मुरलीधर धुत, ओमप्रकाश गणपत कवडे, प्रकाश एच. गजभीव सर्व राहणार शेवगाव यांना आरोपी करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.