कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 05:25 PM2024-03-06T17:25:45+5:302024-03-06T17:26:27+5:30
शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले.
कोपरगाव ( जि. अहमदनगर) : तालुक्यातील चासनळी येथे गोदापत्रात अवैध गावठी दारू भट्टी लावणाऱ्यांवर शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने कारवाई केली यात एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
गुरुवार दिनांक ६ रोजी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरातील गोदावरी नदी पात्रातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू असा एकूण एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमालाचा जागीच नष्ट केला. या घटनेत आरोपी संपत माळी, मिथुन छगन माळी, विशाल कृष्णा दळे (सर्व रा. माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव) या तिघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, इरफान शेख, अशोक शिंदे, संदीप बोटे, दिनेश कांबळे, शाम जाधव, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे आदींनी केली.