रेल्वे मालधक्का अखेर नगरमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:21+5:302021-09-15T04:26:21+5:30
अहमदनगर : येथील रेल्वे मालधक्का इतरत्र न हलविता नगर येथील रेल्वे स्टेशन येथे कामकाज सुरू करण्याचा निर्णय वाहतूकदार व ...
अहमदनगर : येथील रेल्वे मालधक्का इतरत्र न हलविता नगर येथील रेल्वे स्टेशन येथे कामकाज सुरू करण्याचा निर्णय वाहतूकदार व माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयाचा निर्णय दोघांनाही मान्य राहील, असे यावेळी ठरले.
येथील मालधक्क्यावर संप सुरू असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने मालधक्का विळद येथे हलविण्याची कार्यवाही सुरू केली होती; मात्र आमदार संग्राम जगताप यांनी त्यास विरोध केला. मालधक्का इतरत्र न करण्याची भूमिका घेतली. त्यांनी ठेकेदार व माथाडी कामगारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. गेल्या दोन दिवसांपासून ठेकेदार, महामंडळाचे अधिकारी आणि माथाडी कामगारांच्या बैठका सुरू होत्या. अखेर मंगळवारी यावर तोडगा निघाला. वाहतूकदार व माथाडी कामगार यांनी समन्वयाने काम करण्याचे ठरले. दरवाढीबाबत न्यायालयाचा जो निर्णय होईल, तो दोघांनाही मान्य राहील, अशी कबुली ठेकेदार व माथाडी कामगारांनी दिली आहे. यावेळी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले, कामगार आयुक्त जासमीन शेख, नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे, गोविंद सांगळे, मालवाहतूकदार नानासाहेब गाडे, करीम हुंडेकरी, भरत ठाणगे, गुरुविदरसिंग वाही, उद्धव पवार आदींसह माथाडी कामगार उपस्थित होते.
जगताप म्हणाले, रेल्वे स्टेशन वरील मालधक्का हा संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. माथाडी कामगारांना व मालवाहतूकदारांना एकत्रित करून हा प्रश्न मार्गी लावला, असे ते म्हणाले. हमाल माथाडी कामगार संघटनेचे नेते अविनाश घुले म्हणाले की, आमदार जगताप यांनी मध्यस्थी केल्याने मालधक्का नगरमध्येच राहिला असून, कामगारांची होणारी उपासमार टळली आहे. नानासाहेब गाडे म्हणाले की, अनेक वर्षांपासून वाहतूकदार व माथाडी कामगार समन्वयाने काम करत आहेत. यापुढेही असेच एकत्रित राहून काम केले जाईल.
....
सूचना : फोटो: १४ रेल्वे नावाने आहे.