गार्डशिवाय धावली रेल्वे; विसापूर स्थानकातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:42 PM2017-11-11T17:42:36+5:302017-11-11T17:44:44+5:30
विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
विसापूर : विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
कर्नाटक संपर्क क्रांती मेल, हजरत निजामोद्दीन ते यशवंतपूर व हुबळी-बनारस या गाड्यांची विसापूर रेल्वे स्थानकावर क्रॉसिंग होती. क्रॉसिंगसाठी कर्नाटक संपर्क क्रांती मेल विसापूर स्थानकात थांबलेली असताना गार्ड चहासाठी बाहेर गेला. मात्र गाडीला स्थानक सोडण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला. चालक व गार्डचे भ्रमणध्वनीवरून बोलणे न होताच व गार्डकडून हिरवा झेंडा न मिळताच चालकाने गाडी चालू करून विसापूर स्थानक सोडले.
गाडी काही अंतरावर पुढे गेल्यानंतर ही बाब गार्ड व स्थानक व्यवस्थापकांच्या निदर्शनास आली. स्थानक व्यवस्थापकांनी भ्रमणध्वनीवरून चालक व पुढील कुकडी साखर कारखान्याजवळील रेल्वे गेट नंबर १६ च्या गेटमनशी संपर्क साधल्यानंतर मोटरसायकलवरून गार्डला गेट नं.१६ येथे सोडण्यात आले. त्यानंतर गाडी दौंडच्या दिशेने मार्गस्थ झाली. मेल गाड्यांना विसापूर स्थानकावर थांबा नाही, परंतु विसापूर स्थानक दौंड व नगर दरम्यानचे क्रॉसिंग स्थानक आहे.