देवगड संस्थान येथे होणार रेल्वेस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:25+5:302021-03-04T04:36:25+5:30
अहमदनगर : औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. या रेल्वेमार्गाअंतर्गत नेवासा तालुक्यातील देवगड हे संस्थान रेल्वेमार्गाच्या नकाशावर झळकणार आहे. ...
अहमदनगर : औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वे सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. या रेल्वेमार्गाअंतर्गत नेवासा तालुक्यातील देवगड हे संस्थान रेल्वेमार्गाच्या नकाशावर झळकणार आहे. तसेच देवगड येथेही रेल्वेस्थानक होणार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. १) श्रीक्षेत्र देवगड येथे महंत भास्करगिरी महाराज यांची भेट घेऊन चर्चा केली.
श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुरेशचंद्र जैन व मुकेश लाल यांनी सोमवारी देवगडला भेट दिली. त्यांनी दत्तात्रयांचे व किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत संपूर्ण देवालयाच्या परिसराची पाहणी केली. तसेच औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाबाबत भास्करगिरी महाराज यांच्याशी प्रकल्पाबाबत चर्चा केली. याप्रसंगी भास्करगिरी महाराज यांनी सदरचा रेल्वेमार्ग होणे आवश्यक असून, यामुळे लोकांना फायदा होईल, ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी बजरंग विधाते यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद-नगर-पुणे हा रेल्वेमार्ग व्यापारी, उद्योजक, शेतकरी, पर्यटक यांच्यासाठी उपयोगी, व्यावहारिकदृष्ट्या परवडणारा, वेळेची व पैशांची बचत करणारा रेल्वेमार्ग ठरणार आहे. अनेक दिवसांची प्रवासी, लोकप्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
--
असा आहे हा मार्ग
औरंगाबादेतून सुरू होणारा हा रेल्वे मार्ग गंगापूर- श्रीक्षेत्र देवगड संस्थान-नेवासा-शनिशिंगणापूरमार्गे नगर असा जातो. या मार्गामुळे जालना, शेंद्रा, वाळूज, नगर या औद्योगिक वसाहतींचा माल ने-आण करण्यासाठी सुलभता प्राप्त होणार आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातील शेतीमालास मुख्य बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी हा मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे.
-----
फोटो- -०२ देवगड
रेल्वेचे अधिकारी सुरेशचंद्र जैन यांचा सोमवारी भास्करगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे सत्कार केला. समवेत बजरंग विधाते.