मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:37 AM2019-07-12T11:37:20+5:302019-07-12T11:37:25+5:30
भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला.
अकोले/राजूर/भंडारदरा/ राहुरी : भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसानंतर मुसळधार पाऊस झाला़ काही गावांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला. रतनवाडी येथे सुमारे १४ इंच पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणातील पाणीसाठा ४ हजार दशलक्ष घनफूट तर मुळा धरणात गुरुवारी सायंकाळी ६ हजार २२४ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली़
अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघड झाप चालू होती. रात्री उशिरा जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. परिसरातील रतनवाडी शिवारास पावसाने झोडपून काढले़ रात्री सुरू झालेला हा पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कोसळत होता. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी येथे ३४२, घाटघर येथे २१५,वाकी येथे १५२, भंडारदरा येथे १४०, पांजरे येथे १३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
भंडारदरा धरणात दिवसभरात ५७० दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले़ निळवंडे धरणातील पाणी साठा सायंकाळी सहा वाजता १ हजार ४०६ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला होता. प्रवरा खोऱ्यातील टिटवी येथील ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला. कळसूबाई परिसरातील वाकी येथील लघु पाटबंधारे तलावावरील विसर्गात वाढ झाली असून सायंकाळी सहा वाजता हा विसर्ग ७८९ क्युसेक इतका होता. कुरकुंडी नदीवरील २०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा बलठण येथील लघु पाटबंधारे तलाव सकाळी भरून वाहू लागला.
कोतूळ : हरिश्चंद्रगड व पाचनईसह मुळा नदीच्या लाभक्षेत्रात मंगळवारी व बुधवारी जोरदार पाऊस पडत असल्याने गुरुवारी दुपारी मुळा नदीचा विसर्ग ३० हजार क्युसेक इतका झाल्याने नदी काठावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता रामनाथ आरोटे यांनी दिला आहे.
सांगवी धरण भरणार
गणोरे : आढळा नदीपात्रातील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पाडोशी धरणातील ओव्हरफ्लोच्या पाण्याने सांगवी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटातील पावसामुळे पाडोशी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी आढळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात नदी वाहती होण्याची चिन्हे आहेत. पाडोशी व सांगवी हे दोन्ही प्रकल्प देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आहेत. नदी पात्रातील साठवण बंधारे भरून पाणी थेट देवठाण येथील आढळा धरणात येण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.