नगर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; खरिपाच्या पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:38 AM2020-06-26T11:38:06+5:302020-06-26T11:40:40+5:30
नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आले होते. रात्री पाऊस आल्याने शेतक-यांची दाणादाण उडाली.
अहदनगर : नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपर्यंत आर्द्रा नक्षत्राच्या जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पाणी आले होते. रात्री पाऊस आल्याने शेतक-यांची दाणादाण उडाली.
यंदा रोहिणी, मृग नक्षत्रात जिल्ह्याच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला होता. या पावसावर शेतक-यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. परंतु पुन्हा पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची शक्यता निर्माण झाली होती. परंतु गुरुवारी (दि.२५ मार्च ) रात्री व शुक्रवारी (२६ मार्च ) पहाटे जोरदार आर्द्राचा नक्षत्राचा विजेच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद पिकांना जीवदान मिळाले आहे.
नगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले, शिर्डी, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर पाथर्डी, नगर तालुका, नगर शहरातही जोरदार पाऊस झाला.
श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी, चिंभळे, मांडवगण, कोळगाव, पेडगाव येथे पाऊस झाला. काष्टीत एकाच रात्री ७४ मि. मी. पाऊस झाला.
शेवगाव तालुक्यात शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे ४० मि. मी. पाऊस झाला. तर बेलपिंपळगाव येथे ६५ मि. मी. पाऊस झाला. चांदा, घोडेगाव, वडाळा, सोनई पसिरातही पाऊस झाला.
नगर शहरातही जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक घरात पाणी घुसले. भिंगार नाल्यालाही प्रथमच पूर आला होता.
नगर तालुक्यात भिंगार, चिचोंडीपाटील, आठवड, दशमीगव्हाण परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.