जिल्ह्यात पाऊस परतला : खरीप पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:05 PM2019-07-20T12:05:25+5:302019-07-20T12:09:21+5:30

गेल्या २० दिवसांपासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अखेर काहीसा सुखावला.

Rainfall come in district: benefit Kharif crops | जिल्ह्यात पाऊस परतला : खरीप पिकांना संजीवनी

जिल्ह्यात पाऊस परतला : खरीप पिकांना संजीवनी

ठळक मुद्दे२० दिवसांनंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी, अकोले, संगमनेरला झोडपले बोटा परिसरात पावासाची बॅटिंगयेत्या पाच दिवसात जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज

अहमदनगर : गेल्या २० दिवसांपासून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणारा शेतकरी शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या पावसाने अखेर काहीसा सुखावला. अखेरच्या घटका मोजणाऱ्या खरीप पिकांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. संगमनेर, अकोले, नगर तालुका, श्रीगोंदा, तसेच जामखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
गेल्या महिनाभरापूर्वी कमी-अधिक झालेल्या पावसावर जिल्हाभर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्यानंतर आहे त्या ओलीवर पिके उगवून आली. परंतु गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने ही पिके डोळ्यादेखत जळून जाताना शेतकरी अस्वस्थ झाला होता.
जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झालेल्या होत्या. ही सर्व पिके पावसाअभावी संकटात सापडली होती. परंतु हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारपासूनच पावसाला सुरूवात झाली. नगर शहरात चार वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान खरीप पिकांसाठी मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

अकोले : अकोले शहर परिसरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. साधारण अर्धा तास पाऊस सुरू होता. तालुक्याच्या पूर्व भागातील कळस परिसरात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अकोले शहरात धडकला.
अल्पावधीतच पावसाचे पाणी पाणथळ सखल जागी झाले होते. पावसाच्या सुरूवातीला वादळ वारा व विजेचा कडकडाटही होता. तालुक्यातील आढळा खोºयातही मुसळधार पाऊस झाला. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी या पावसाने सुखावला आहे.

बोटा परिसरात पावासाची बॅटिंग
बोटा : सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयासह विजेच्या कडकडाटात पठारभागातील बोटा, घारगाव व इतर गावांमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे पाणी पातळी वाढण्यास तसेच माळरानांवरील हिरवा चारा बहरण्यास मदत होणार आहे. अकलापुर, घारगाव, नांदूर खंदरमाळ, सारोळेपठार, वरूडी पठार व लगतच्या गावांमध्ये एक तास जोरदार पाऊस झाला.

पारनेर तालुक्यात धुवाँधार
अळकुटी : पारनेर तालुक्यातील पश्चिम भागातील कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी, शिरापूर, रांधे, दरोडी, चोंभूत, म्हस्केवाडी या ठिकाणी मुसळधार पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी साडे चारच्या सुमारास हा पाऊस झाला. शेतकरी आता पावसाळी कांद्याचे रोप टाकण्यासाठी सज्ज होणार आहे.

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात वारंवार दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असतानाच शुक्रवारी घारगाव परिसरात झालेल्या पावसाने आंबी खालसा परिसरात उपरस्त्यावर दरड कोसळली. मोठे दगड रस्त्यावर पडल्याने हा उपरस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. दरड कोसळून रस्ता बंद होण्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती.

संगमनेर : शहर व तालुक्यात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतात पाणी साचले होते. ओढे, नाले वाहते झाले असून सिमेंट बंधारे तुडूंब भरले आहेत. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. साधारण दोन तास पाऊस सुरू होता. पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, मोधळवाडी, वरूडी पठार, सारोळे पठार, ढोरवाडी, सावरगाव घुले, सावरगाव तळ, जवळे बाळेश्वर, खंदरमाळवाडी, माहुली, घारगाव, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, बोटा, माळवाडी आदी गावात जोरदार पाऊस झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापूरी घाटातील प्रसिद्ध तामकडा धबधबा या पावसाने वाहता झाला.


येत्या पाच दिवसात जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज
राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या अहमनगर जिल्ह्यात येत्या पाच दिवसात तुरळक पावसाची अपेक्षा व्यक्त केली आहे़ बंगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभाग प्रमुख प्रा. रवींद्र आंघळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़

 

Web Title: Rainfall come in district: benefit Kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.