टंचाई आढावा बैठकीत शेवगावला तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:02 PM2018-04-02T18:02:42+5:302018-04-02T18:02:57+5:30
शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मूलभूत विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला.
शेवगाव : शेवगाव पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत गावोगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मूलभूत विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. दरम्यान विविध विभागाच्या अधिका-यांनी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेली. तर आमदार राजळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
पिण्याचे पाणी, रेंगाळलेली जलयुक्त शिवार व जलसिंचनाची कामे, वीज, सार्वजनिक रस्ते, रोजगार हमीची कामे आदी रेंगाळलेल्या मुलभूत समस्यांबाबत तक्रारींचा पाऊस पडला. यावेळी आगाऊ सूचना देऊनही बैठकीत सहभागी झालेल्या विविध शासकीय विभागात समन्वयाचा अभाव दिसून आल्याने आमदारासह प्रांताधिकारी, तहसीलदार, आदींनी सर्वांनी मिळून टंचाईचा सामना करणे आवश्यक असताना जबाबदार अधिकारी अशाच पद्धतीने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणार असतील तर टंचाई आढावा बैठक काय कामाच्या? असा सवाल करून आजच्या बैठकीतील तक्रारींबाबत तातडीने निपटारा झाला नाही तर संबंधितावर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल, असा सज्जड दम भरला.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उच्चांकी तापमानामुळे शेवगाव तालुक्यात आतापासूनच अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील चेडे चांदगाव, आखेगाव, बेळगाव, ठाकूर पिंपळगाव, शोभानगर, मुरमी, बाडगव्हाण आदी गावात पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. अनेक गावात हातपंप नादुरुस्त आहेत. शहर टाकळी व चोवीस गावच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकबाकीच्या कारणावरून दीर्घकाल बंद आहेत. नागलवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेच्या पाझरतलाव, नवीन साठवण बंधारा आदी रेंगाळलेल्या कामांना चालना देण्याची मागणी करण्यात आली. खरडगाव येथील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट दिवे रात्रंदिवस सुरु आहेत. याबाबत माहिती देऊनही कार्यवाही होत नाही. शोभानगर येथील वीज पुरवठा केबल वायर जळाल्याने सध्या बंद आहे. गावात हरिनाम सप्ताह सुरु असल्याने तातडीने वीज पुरवठा सुरु व्हावा. अनेक गावात सार्वजनिक रस्त्याची दुरवस्था झाल्याने जरी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला तर गावात टँकर येण्यास अडचणी येणार असल्याने याबाबत रस्ता दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावे. टंचाईसदृश्य गावातील अनाधिकृत पाणी उपशाबाबत संबंधितावर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी नोंदविण्यात आली.